मुंबई : प्रतिनिधी
हार्बर मार्गाचा लवकरच गोरेगावपर्यंत विस्तार होणार असल्याने सध्या अंधेरी ते पनवेल अशा चालणार्या फेर्या आता थेट गोरेगावहून सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे गाडी न बदलता पश्चिम उपनगरातील प्रवाशांना थेट नवी मुंबई-पनवेलला जाणे सहज शक्य होणार आहे. सध्या हार्बर रेल्वेचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंत सुरू आहे.
मुंबई रेल्वे विकास महांमडळातर्फे (एमआरव्हीसी) गोरेगावपर्यंत हार्बर लोकल सेवा विस्ताराचे काम लवकरच पूर्ण केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्ग जनतेच्या सेवेत येण्यासाठी मुख्य सुरक्षा आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. त्या प्रक्रियेसाठीही महामंडळातर्फे लवकरच प्रयत्न केला जाणार आहे.
सीएसएमटी ते अंधेरी या हार्बर मार्गावर 91 फेर्या चालविल्या जात असून हार्बरसाठी यापूर्वी अंधेरीपुढे कोणतीही मार्गिका उपलब्ध नव्हती. हार्बरवर त्याप्रकारचा पर्याय उपलब्ध झाल्याने गोरेगावपर्यंत सेवेचा विस्तार शक्य होणार आहे. अंधेरी स्थानकात हार्बरवर येणार्या लोकल पुन्हा सीएसएमटीपर्यंत नेण्यासाठी काही वेळ लागत होता. त्याचा वेळापत्रकावरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर अंधेरीऐवजी गोरेगावपर्यंत सेवा विस्तारामुळे हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे.
चर्चगेट ते अंधेरीमध्ये 65 फेर्या चालत असून, त्या फेर्यांचा विस्तारही शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेने 50 टक्के फेर्या थेट गोरेगावपर्यंत नेण्याची तयारी दर्शविली आहे. गोरेगाव विस्ताराचा हा अंतिम टप्पा लवकरच कार्यान्वित होणार असून, याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले. सीएसएमटी ते अंधेरी सेवांचा विस्तार गोरेगावपर्यंत करणे अपेक्षित आहे. पण चर्चगेट ते अंधेरी सेवांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.