Sat, Apr 10, 2021 20:06
सौदी अरेबियाला दणका देण्यासाठी भारत, या देशातून कच्च्या तेलाची खरेदी वाढवणार

Last Updated: Apr 08 2021 3:49PM

नवी दिल्ली : सागर पाटील

क्रूड तेलाचे उत्पादन स्थिर ठेवून दर नियंत्रणात ठेवण्याची भारताची मागणी सौदी अरेबियाने धुडकावून लावल्याच्या पार्श्वभूमीवर सौदीला धडा शिकविण्याचा निर्धार भारताने केला आहे. यातूनच आगामी काळात सौदी अरेबियावरील तेलाची भिस्त कमी केली जाणार आहे. दुसरीकडे तेलाची गरज भागविण्यासाठी अमेरिका, गयाना आणि आफ्रिकेतून कच्चे तेल खरेदी केले जाणार असल्याची माहिती गुरुवारी पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

अधिक वाचा : महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीतही लसीची टंचाई?

कच्च्या तेलाची आयात करणार्‍या देशांत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर निर्धारित होत असले तरी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून घेतले जाणारे निर्णय तेलाच्या दरांवर प्रभाव टाकतात. ओपेक संघटनेवर सौदी अरेबियाचा दबदबा आहे. 

क्रूड तेलाचे दर स्थिर ठेवून दर नियंत्रणात ठेवावे, अशी मागणी भारताने काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाकडे केली होती. मात्र सौदीने भारताची मागणी धुडकावून लावत मनमानी पध्दतीने दर चढे ठेवले आहेत. यातूनच सौदीला दणका देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सौदीहून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करावी. त्या बदल्यात इतर देशांतून क्रूड तेलाची आयात वाढवावी, असे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिले आहेत. ज्या देशांतून आयात वाढविली जाणार आहे, त्यात अमेरिका, गयाना आणि काही आफ्रिकन देशांचा समावेश आहे. 

अधिक वाचा : भाजपला धक्का; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

कोरेाना संकटातून सावरत असताना क्रूड तेलाच्या चढ्या किंमती विकासाच्या मार्गात बाधा बनत असल्याचा युक्तीवाद भारत सरकारने सौदी अरेबियाकडे केला होता. मात्र गेल्यावर्षी दर पडलेले असताना जे तेल खरेदी करण्यात आले होते, त्याचा उपयोग भारताने करावा, असा अजब सल्ला सौदीचे पेट्रोलियम मंत्री प्रिन्स अब्दुलअजिज बिन सलमान यांनी दिला होता. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी टीका केली होती.

अधिक वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोनावरील लसीचा दुसरा डोस 

पुढील महिन्यात सौदीहून होणारी तेलाची आयात 35 टक्क्यांनी कमी करण्याची योजना आहे. या तेलाची पूर्तता ब्राझीलच्या टुपी ग्रेड, गयानाच्या लिजा ग्रेड आणि नॉर्वेच्या जोहन स्वेरड्रप तेलाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे समजते. जागतिक बाजारात सध्या ब्रेंट कच्च्या तेलाचे दर 63 डॉलर्स प्रतिबॅरलवर असून डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे दर 59.50 डॉलर्सच्या दरम्यान आहेत.