Mon, Jan 18, 2021 08:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ

देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ

Last Updated: Jul 06 2020 10:28AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. काल दिवसभरात २४ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची वाढ झाली. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालल्याने भारताने रशियालाही मागे टाकले आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात २४ हजार २४८ नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशात बाधितांचा आकडा ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहचला आहे. बाधितांच्या आकड्यासोबत मृतांच्या आकडेवारीतही कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात ४२५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १९ हजार ६९३ वर पोहचला आहे. 

सध्या देशात २ लाख ५३ हजार २८७ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर आत्तापर्यंत ४ लाख २४ हजार ४३३ रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे ​दिसून येत आहे. दररोज कोरोनाबाधितांसंबंधीची उच्चांकी आकडेवारी समोर येत आहे. अश्यात देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. गेल्या एका दिवसात २४ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या दरम्यान १५ हजारांहून अधिक उच्चांकी रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. पंरतु, गेल्या आठवड्याभरातच तब्बल साडे तीन हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. जगाच्या ४.७५ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत देशाचा मृत्यूदर त्यामुळे २.८८% तसेच महाराष्ट्राचा ४.२७% नोंदवण्यात आला आहे. 

गेल्या एका दिवसात महाराष्ट्रासह (६,५५५) तामिळनाडू (४,१५०), दिल्ली (२,२४४),कर्नाटक (१,९२५), तेलंगणा (१,५९०), उत्तर प्रदेश (१,१५३) तसेच आंधप्रदेशात (९९८) सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले. या राज्यांच्या खालोखाल पश्चिम बंगाल (८९५), गुजरात (७२५), आसाम (७२०), राजस्थान (६३२) तसेच हरियाणात (४५७) सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली.

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ११ लाख ३८ हजार ७०६ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून यातील २ लाख १६ हजार ७९ (१८.९८%) नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला. राज्यात जवळपास ६५ % (२,९०१) पुरुषांचा कोरोनलामुळे मृत्यू झाला. तर, कोरोनाग्रस्त महिल्यांचे मृत्यूचे प्रमाण हे ३५ % (१,५८३) एवढे नोंदवण्यात आले आहे. एकूण कोरोनारुग्णांचा विचार केला तर १ लाख १८ हजार ३९४ (६२%) पुरुषांमध्ये तर, ७३ हजार ६९५ (३८%) महिलांमध्ये कोरोनासंसर्ग आढळून आला.

१ कोटींहून अधिक नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या

देशात आतापर्यंत १ कोटींच्या घरात नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी वैद्यकीय चाचण्यांच्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली. दिवसभरात केवळ १ लाख ८० हजार ५९६ नागरिकांच्याच वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील ९९ लाख ६९ हजार ६६२ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्याभरात दररोज सरासरी २ लाख २० हजारांहून अधिक नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत, हे विशेष. 

आयसीएमआरच्या प्रयोगशाळांच्या नेटवर्कमध्ये वाढ 

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा फक्त पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) कोरोना तपासणी केली जात आहे. पंरतु, जानेवारी ते जुलै ५ पर्यंत देशातील १ हजार १०० प्रयोगशाळांमध्ये कोरोना तपासणीची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली. यातील ७८६ सरकारी, तर ३१४ खासगी प्रयोगशाळा आहेत, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत आता फक्त अमेरिका आणि ब्राझीलच्या मागे आहे. अमेरिकेत कोरोनाची २८ लाख ३९ हजारांहून अधिक प्रकरणे आहेत, तर ब्राझीलमध्ये ही संख्या १५ लाख ७७ हजार आहे. अमेरिकेत या धोकादायक आजारामुळे १ लाख २९ हजार ६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ब्राझीलमध्ये ६४ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे.

देशासह महाराष्ट्रातदेखील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात ६ हजार ५५५ बाधीत रुग्णांची वाढ असून बाधीतांची संख्या २ लाख ६ हजार ६१९ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ११ हजार ७४० जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सध्या राज्यात एकूण ८६ हजार ४० रूग्णांवर उपचार सुरू आहे.