Fri, May 07, 2021 18:01
देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटींवर! २४ तासांत रुग्णसंख्येत किचिंत घट

Last Updated: May 04 2021 10:32AM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येचा एकूण आकडा २ कोटी पार झाला आहे. देशातील रोजच्या रुग्णसंख्येचा आकडा ४ लाखांवर गेला होता. आता हा आकडा काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : डबल म्युटंटचा महाराष्ट्राला तडाखा!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ५७ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३ वर पोहोचली आहे. यातील १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ३४ लाख ४७ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ३ लाख २० हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह चार राज्यांत काल सोमवारी नव्या रुग्णसंख्येत अचानक घट झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली ही ती राज्ये असून, छत्तीसगडमध्येही घट नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात दररोज ६० हजारांपेक्षा अधिक असलेली बाधितांची संख्या आता ५० हजारांच्या आत आली आहे.

वाचा : महाराष्ट्रासह चार राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली

विशेषत:, महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांतून कोरोना कमी होण्याची लक्षणे दिसली. मात्र, रुग्णसंख्येतील ही घट अगदीच प्राथमिक लक्षणासारखी असून, इतक्यात त्यावरून काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

वाचा : सर्रास ‘सीटी स्कॅन’ कॅन्सरला निमंत्रण