Wed, Jul 08, 2020 04:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाईट लाईफसाठी मद्यपानाची वेळ वाढवा : आहार

नाईट लाईफसाठी मद्यपानाची वेळ वाढवा : आहार

Last Updated: Feb 19 2020 1:47AM
मुंबई : पुढारी डेस्क

बराच गाजावाजा करून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या मुंबईच्या नाईट लाईफ  उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून हा प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांच्या संघटनेने मद्यपानाची वेळ 1.30 वरून पहाटे 3.30 पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

ही वेळ वाढवल्याशिवाय नाईट लाईफ हॉटेलचालकांना परवडणार नसल्याचे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांची संघटना ‘आहार’ने  कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही परवानाधारक असल्यामुळे आम्हाला सरकारने वेळ वाढवून द्यावी अन्यथा नाईट लाईफमध्ये ठिकठिकाणी असलेल्या फूड ट्रकच्या परिसरात बेकायदा मद्यपान मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असून, त्यामुळे सरकारचा महसूल बुडणार असल्याचा इशाराही ‘आहार’ने दिला आहे.

मद्यपानाचे वय 21 करा 
मतदानाचे वय 18 असून विवाहासाठी 21 वर्षे लागतात, तर मद्यपानासाठीच 25 वय का असावे, असा सवाल ‘आहार’ने केला आहे. कॉलेजची अनेक मुले मद्यपान करतात, त्यामुळे 25 ऐवजी 21 व्या वर्षी मद्यपानाची परवानगी देण्याची मागणी होत आहे.