Thu, Jul 09, 2020 22:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल : मुख्यमंत्री

काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल : मुख्यमंत्री

Last Updated: Apr 19 2020 11:14PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सोमवारपासून लॉकडाउनमधून काही उद्योग-व्यवसाय सशर्त सुरू करण्यास माफक मुभा देण्यात आली असली; तरी जिल्ह्यांच्या सीमा मात्र सीलबंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. माझे काही निर्णय कटू असले आणि त्यामुळे मला वाईटपणा आला; तरी राज्याच्या भल्यासाठी मी तो स्वीकारायला तयार आहे, असे ते म्हणाले. पुणे-मुंबईसारख्या रेड झोनमध्ये वृत्तपत्रांच्या स्टॉल्सना परवानगी देण्यात आली असली; तरी घरोघरी वृत्तपत्र टाकायला बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय घेतल्यावर कुणी मला वाईट म्हटले तरी चालेल; पण जनतेच्या भल्यासाठी वाईटपणा घेण्याची आपली तयारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वृत्तपत्रांसंदर्भात उर्वरित महाराष्ट्रासाठी दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट  केले.

सोमवारपासून काही जिल्ह्यांतील उद्योग-व्यवसाय आणि अन्य व्यवहार सुरू करण्यास केंद्र सरकारसह राज्याने मान्यता दिली आहे. मात्र, ही सवलत देताना काही अटींचे पालन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमातून संवाद साधला.

यावेळी बोलताना संयम, धैर्य, जिद्दीने न दिसणार्‍या शत्रूशी लढणार्‍या जनतेचे कौतुक करताना खासगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी दवाखाने खुले ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकांनी सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे कोणी आपल्याला वाळीत टाकण्याच्या भीतीने लपवू नयेत. घरी उपचार न करता फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोनाचे निदान वेळेत झाल्यास त्यातून पूर्णपणे बरे होता येते, सहा महिन्यांच्या चिमुकलीपासून ऐंशी वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकजण बरे झाले आहेत, असा दिलासा ठाकरे यांनी दिला.

95 टक्के टेस्ट निगेटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाची साथ सुरू होऊन सहा आठवडे झाले. शनिवारी संध्याकाळपर्यंत 66 हजार 796 जणांच्या टेस्ट झाल्या असून, त्यापैकी किमान 95 टक्के टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. 3,600 जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले, तर 350 जण बरे झाले आणि 70 ते 75 टक्के रुग्ण अतिसौम्य किंवा लक्षण नसलेले आढळले, अशी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. 52 टक्के रुग्ण गंभीर आणि अतिगंभीर परिस्थितीत असून, त्यांना वाचवणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगताना, यापैकी बरेचजण अखेरच्या टप्प्यात डॉक्टरकडे पोहोचल्याचे ते म्हणाले. मात्र, मुंबईसह राज्यातल्या रुग्णांच्या आकड्यात काहीशी घट दिसत असली, तरी हे आकडे वर-खाली होत असल्याने आपण कोरोनामुक्त झाल्याच्या भ्रमात राहून चालणार नाही, त्याचा तपास करण्याच्या सूचना आपण दिल्याचे उद्धव म्हणाले.

केंद्राकडे गहू, डाळीची मागणी : केंद्र सरकारकडून केवळ अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत देण्यासाठी फक्त तांदूळच आला असून, गहू आणि डाळ मिळावी, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असल्याचे उद्धव यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे अर्थकारण रुतले असले; तरी या संकटातून बाहेर येण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांत काही उद्योग-धंद्यांना परवानगी दिली जाणार असली; तरी जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार असून, जिल्ह्यातच मालाची ये-जा करण्यास माफक परवानगी दिली जाणार आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

3 मेपर्यंत रेल्वे बंदच : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. मात्र, 3 मेपर्यंत देशात कुठलीच रेल्वे किंवा विमान सेवा सुरू होणार नाही. मात्र, सद्यस्थितीत बंधनाशिवाय पर्याय नाही. स्थलांतरित मजूर आता शांत झाले असून, लवकरच केंद्राशी बोलून निर्णय घेतला जाईल, असा दिलासा ठाकरे यांनी दिला.

राज्य सरकारकडून केल्या जाणार्‍या उपाययोजना काही जणांच्या मनासारख्या होत नसल्याने ते रागावले असले, तरी ज्यांच्या मनासारखे होत आहे, ते कौतुकही करत आहेत. वृत्तपत्रे स्टॉलवर उपलब्ध करून द्यायला हरकत नाही; पण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घरोघरी वृत्तपत्र टाकू देणे मला योग्य वाटत नाही. मला कोणाशी वाद नाही करायचा. माझी भीती अनाठायी असेल. मला कुणी वाईट म्हणतील; तर मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कौतुकाबरोबर वाईटपणा घ्यायला तयार आहे.
    - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री