Thu, Jun 24, 2021 11:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन ठिकाणी इमारती कोसळून ४ ठार

दोन ठिकाणी इमारती कोसळून ४ ठार

Last Updated: Jul 16 2020 11:59AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जीपीओसमोरील भानुशाली बिल्डिंगच्या उत्तरेकडील भाग गुरुवारी सायंकाळी अचानक कोसळला. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले. तर, दोन जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही इमारत दुरुस्तीसाठी रिकामी करण्यात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मालवणीत 4 मजली घर पडून दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास नाल्यालगतचे जुने कलेक्टर कंपाउंड पावसामुळे ही दुर्घटना घडली. या घराखाली 15 लोक अडकले होते. स्थानिकांनी  ढिगार्‍याखालून  14 लोकांना  बाहेर काढले. 18 वर्षीय फैजल सय्यद या तरुणाचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला तर 23 वर्षीय महिला अंजुम शेख  तिसर्‍या मजल्यावर ढिगार्‍याखाली अडकली होती तिला काढण्यासाठी अग्निशमन दल तसेच स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. तिला संध्याकाळी 5 वाजता काढण्यात यश आले.मात्र तोपर्यंत तिचा जीव गेला होता.

सीएसटी मिंट रोड, लकी हाऊस जवळ भानुशाली इमारतीचा उत्तर कडील काही भाग सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. ही इमारत म्हाडाची असून ती काही महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे इमारतीत कोणीच रहिवाशी राहत नव्हते. मात्र येथे काही कामगार राहत असल्याचे समजते. इमारतीचा भाग कोसळला तेव्हा यात काही कामगार जखमी झाल्याचे बोलले जात आहे. यापैकी दोन धन जागी ठार झाले असून त्यांची ओळख पटलेली नाही ही तर जखमींपैकी नेहा ( वय 45)  या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तर भालचंद्र कानू (वय 48) हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन, दोन रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने पोहचली. पालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त, पोलिस, म्हाडा अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनेची पाहणी केली.

कोसळलेल्या भागाचा ढिगारा उपसण्यासाठी पालिकेचे 50 कामगार 6 जेसीबी,10 डंपर घटनास्थळी तातडीने पोहचले. पालिकेचे सहाय्यक अभियंता व दोन दुय्यम अभियंता यांच्या देखरेखीखाली रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. दुरूस्तीचे काम सुरू असताना अपघात झाल्यामुळे या अपघाताची म्हाडातर्फे चौकशी करण्यात येणार आहे.