Mon, Sep 21, 2020 11:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीची आजपासून अंमलबजावणी

प्लास्टिकबंदीची आजपासून अंमलबजावणी

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात प्लास्टिक तसेच थर्माकोलपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारपासून या बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका तर ग्रामीण भागात महसूल यंत्रणेवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या, पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, सर्व प्रकारची प्लास्टिक वेष्टणे, थर्माकोलपासून तयार केलेल्या प्लेट, कप, ग्लास, वाटी, काटे, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, स्प्रेड शिट्स, प्लास्टिक पाऊच आदींवर बंदी घालण्यात आलेली आहे. अन्‍न साठवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिकच्या पिशव्या, औषधांची वेष्टणे, कृषी, वन व फलोत्पादन तसेच रोपवाटिकांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्या व शिट्स यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. बंदी आदेश मोडल्यास तीन महिन्यांचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुधाच्या पिशव्या व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांना बंदीतून वगळण्यात आले असून, त्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्या पुन्हा खरेदी करण्याची अट घालण्यात आली आहे. ग्राहकाने पिशवी परत केल्यानंतर त्यांना पिशवीमागे 50 पैसे, तर बाटली परत केल्यानंतर बाटलीमागे एक रुपया परत मिळणार आहे. दूध डेअरी, वितरक व दूध विक्रेत्यांंवर ग्राहकांकडून खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाणी विक्री करणार्‍या कंपन्यांना तीन महिन्यांत बाटल्या पुनर्खरेदीची व्यवस्था उभी करावी लागणार आहे.

पोलीस पाटलांनाही कारवाईचे अधिकार

शहरी भागापासून गावपातळीवर प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंलबजावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायद्यातील तरतुदीनुसार महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारीतील अधिकार्‍यांपासून गावच्या पोलिस पाटलांपर्यंत सर्वांनाच अधिकार देण्यात आले आहेत. आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, सर्व टूरिझम पोलीस, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस, विक्रीकर निरीक्षक, वनक्षेत्रपाल यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात करवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.