मनात आणले तर शिवसेनेचे सरकार आणू

Last Updated: Nov 09 2019 1:38AM
Responsive image
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांनी मातोश्री येथे शुक्रवारी झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन केले.


मुंबई : खास प्रतिनिधी
सत्तास्थापनेची तयारी आम्ही देखील केली आहे. मनात आणले तर शिवसेना सरकार स्थापन करू शकते, असा दावा करताना सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पहिली संधी द्यावी, असे आमचे मत आहे. मात्र, काळजीवाहू सरकार म्हणून अधिक काळ सत्तेत राहून सूत्रे हलवून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आम्ही शिवसेनेसोबतच सरकार स्थापन करू, असे भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत. तसे असेल तर निवडणुकीआधी ठरल्यानुसार सत्ता स्थापना करा, आम्ही मुख्यमंत्रिपदावर अजून ठाम आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

संभाजी भिडे ‘मातोश्री’वर आले होते. पण उद्धव ठाकरे घरी नसल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्याबद्दल बोलताना आम्हाला मध्यस्थाची गरज नाही. हा विषय भाजप आणि सेनेचा आहे. यात तिसर्‍यांनी मध्ये पडण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सुनावले.

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी इथे कर्नाटकप्रमाणे पैसा व सत्तेचा घोडेबाजार चालणार नाही. ज्यांच्याकडे बहुमत असेल, त्यांचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिसेल. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन केव्हाच जायला हवे होते. पण काळजीवाहू म्हणून बसायचे आणि सूत्रे हलवायची हा महाजनादेशाचा व संविधानाचा अपमान असल्याची टीका राऊत यांनी केली.

भाजपच्या नेत्यांवर सेनेकडून सुरू असलेल्या टीकेबद्दल, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी शिवसेनेची चर्चा सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्‍त केली होती. त्यावर विचारले असता अनेक राज्यांत विचार जुळत नसलेल्या व पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करणार्‍या पक्षांसोबत भाजपने मैत्री केल्याची उदाहरणे देताना राम मंदिर, कलम 370 याबाबत तीव्र मतभेद असेलल्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून भाजप सत्तेत बसला आहे, असा पलटवार त्यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलण्यात गैर काय, असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यक्‍तिगत टीका सेनेने केलेली नाही, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राऊत यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा नेहमीच आदर केला असून, व्यक्‍तिगत टीका शिवसेनेकडून केली नसल्याचे ते म्हणाले.

फडणवीसांना शुभेच्छा!
पुन्हा एकदा राज्यात भाजपचेच सरकार येणार, असा दावा फडणवीस करत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी सरकार स्थापन करावे, असे आव्हानच राऊत यांनी दिले. शिवसेनेकडे कोणता पर्याय आहे? शिवसेना सरकार स्थापन करणार का? असे विचारले असता आम्ही ठरवले तर निश्‍चितच सरकार बनवू शकतो, असे राऊत म्हणाले.