Mon, Jan 18, 2021 09:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जलविद्युत प्रकल्पातून वीज क्षमता वाढणार

जलविद्युत प्रकल्पातून वीज क्षमता वाढणार

Last Updated: Jul 10 2020 1:39AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण होणारे प्रदूषण व निर्मिती अथवा खरेदीचा जास्तीचा दर यामुळे नवे जलविद्युत प्रकल्प तयार करण्याबरोबरच सौर, पवन आदी स्त्रोतातून ऊर्जा निर्मिती करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. याचाच भाग म्हणून जलसंपदा विभागाचे 8 जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्राची जलसंपदा क्षमतेचा आढावा घेऊन जलविद्युत प्रकल्पाची क्षमता वाढविण्याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यात यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. यावेळी ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऊर्जा विभागाच्या अंतर्गत मोडणार्‍या महानिर्मिती कंपनीकडे जलसंपदा विभागाने 27 जलविद्युत प्रकल्प भाडेपट्टी तत्वावर हस्तांतरित केले आहेत. त्याबाबतचा करारनामा मसुदा अंतिम करण्याबाबत जलसंपदा आणि महानिर्मिती कंपनी यांच्या अधिकार्‍यांत चर्चा झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे 8 जलविद्युत प्रकल्प महानिर्मितीकडे हस्तांतरित करण्याबाबत विचार करण्यात आला. ऊर्जा विभागाला सुमारे 2285 कोटी रुपये जलसंपदाला वीज विक्री व भाडेपट्टी देणे बाकी आहे. शिवाय हस्तांतरित केलेल्या जलविद्युत प्रकल्पांच्या मिळणार्‍या भाडेपट्टीवर सेवाकर व जीएसटी आकारणीबाबत चर्चा करण्यात आली.

कोयना प्रकल्पग्रस्त महानिर्मितीत?

कोयना प्रकल्पाग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये सेवेत सामावून घेता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचे ठरविण्यात आले.