Wed, May 27, 2020 02:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दवाखान्यांत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?

दवाखान्यांत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?

Last Updated: Mar 30 2020 12:02AM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश देण्यात आला आहे. असे असतांना, अवघ्या 10-15 फुटांची डिस्पेन्सरी वा नर्सिंग होम, छोट्या रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, असा प्रश्‍न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे. आम्ही फॅमिली डॉक्टर म्हणून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे औषधे लिहून देत मोफत सेवा देत आहेत. त्यात दवाखाने व नर्सिंग होम चालू राहिल्यास होणार्‍या गर्दीमुळे संसर्ग होण्याचा धोका देखील संभवत आहे. 

साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1987 अन्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदणीकृत रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आस्थापना बंद राहिल्यास परवाना बंद करण्याबरोबरच फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाने ठाणे शहरातील नर्सिंग होम चालक डॉक्टर व जनरल प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. बहुसंख्य डॉक्टरांचे दवाखाने दुकानांच्या गाळ्यात सुरू आहेत. तर 1 हजार फुटांपेक्षा कमी जागेत नर्सिंग होम सुरू आहेत. बहुसंख्य डिस्पेन्सरी 10 ते 12 फूट लांब जागेत आहेत. या जागेतच तपासणी कक्ष, रुग्णांसाठी आसन व्यवस्था आहे. आता भारतात कोरोनाचा तिसरा टप्पा सुरू होत असून, अशा परिस्थितीत एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला जबाबदार कोण, असा डॉक्टरांचा सवाल आहे. 

ठाण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयातील ओपीडीची जागा कमी आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे. छोट्या वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणारे बहुतांशी रुग्ण हे फॅमिली पेशंट वर्गातील आहेत. या रुग्णांना डॉक्टरांचा मोबाईल क्रमांकही माहिती आहे. त्यांना डॉक्टरांकडून व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मार्गदर्शन केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत मोठी जागा असलेल्या रुग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांची तेथे तपासणी केली जाते. मात्र, सर्व दवाखाने उघडल्यास रुग्णांची गर्दी होईल. अनेक रुग्ण रक्तदाब किंवा मशीनने शुगर तपासणीसाठीही येतील. अशा परिस्थितीत छोट्या दवाखान्यात वा नर्सिंग होममध्ये सहा फूट अंतर ठेवत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार, असा प्रश्‍न डॉक्टरांचा आहे.