Tue, Aug 04, 2020 14:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून हॉटेल्स; पुढील आठवड्यात रेस्टॉरंट्स सुरू होणार

आजपासून हॉटेल्स; पुढील आठवड्यात रेस्टॉरंट्स सुरू होणार

Last Updated: Jul 08 2020 1:31AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे तीन महिने बंद असलेले लॉज आणि रहिवास हॉटेल्स उद्या, बुधवारपासून सुरू होणार असली, तरी त्यातील रेस्टॉरंटस् मात्र तूर्त केवळ तेथे राहणार्‍या ग्राहकांनाच खुली असणार आहेत. तेथे बाहेरील खवय्यांना प्रवेशबंदी असेल. या प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेलातून केवळ 33 खोल्यांची क्षमताच हॉटेलचालकांना वापरता येणार आहे.अन्य रेस्टॉरंट पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

मिशन बिगिन अगेनमध्ये रेस्टॉरंट्सना केवळ पार्सल सेवा देण्याची मुभा आधीच दिली गेली असली,तरी कामगारच निघून गेल्याने ही सेवादेखील देणे अशक्य झाले आहे. हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प झाला असून तो पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात होती. अखेर यासाठी कंटेनमेंट झोनबाहेरच्या निवासी हॉटेलांना सशर्त परवानगी दिली गेली असली,तरी त्यानुसार हॉटेल्स पुन्हा सुरू झाली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही,असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याचे कारण हॉटेलांच्या क्षमतेपैकी अवघी 33 टक्के क्षमताच वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. बहुतेक निवासी हॉटेलांची स्वतःची रेस्टॉरंट आहेत. मात्र या रेस्टॉरंटमध्ये केवळ तेथे राहणार्‍या ग्राहकांनाच पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. 

बाहेरील खवय्यांना तेथे प्रवेश नसेल. आता हॉटेलची केवळ 33 टक्केच क्षमता सुरू होणार असेल, तर ही रेस्टॉरंट चालवणे कसे परवडणार? असा सवाल विचारला जात आहे. शिवाय या हॉटेलातून राहणार्‍यांनी शक्यतो रूम सर्व्हिसचा वापर करावा असेही अधिसूचनेत म्हटले आहे. निव्वळ खानपान सेवा देणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडण्यासाठी मात्र अजून आठवडाभर तरी वाट पाहावी लागणार आहे.