Thu, Jan 21, 2021 15:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमचं पुढचं पाऊल बेमुदत संप, डॉक्‍टरांचा इशारा

आमचं पुढचं पाऊल बेमुदत संप, डॉक्‍टरांचा इशारा

Published On: Jan 02 2018 3:07PM | Last Updated: Jan 02 2018 3:07PM

बुकमार्क करा
मुंबईः प्रतिनिधी

भाजप सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांची संघटना आयएमएने मंगळवारी देशव्यापी संप पुकारला आहे. येणाऱ्या काळात गरज पडली तर, बेमुदत अनिश्चितकालीन संप करु असा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला आहे.

केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात आता वातावरण चांगलच पेटलं आहे. डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मंगळवारी १२ तास कामबंद आंदोलन केले. “आमचं पुढचं पाऊल बेमुदत संपाचं असेल. त्याची गरज पडल्यात आम्ही अनिश्चितकालीन संपावर जाऊ” असा आयएमने इशारा दिला आहे. 

मुंबईत महाराष्ट्र आयएमएच्या डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक डॉक्टरांच्या आणि सामान्य रुग्णांच्या विरोधात आहे. यामुळे भ्रष्टाचार वाढेल, असे डॉक्टरांचं मत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सरकारविरोधात दोन हात करायचे निश्चित केले आहे.

आयएमएचे सचिव डॉ. पार्थिव सांघवी म्हणाले, ‘‘आमचं पुढचं पाऊल बेमुदत संपाचं असेल, गरज पडल्यास आम्ही हा निर्णयही घेऊ. सर्व ओपीडी बंद असून, आपात्कालीन सुविधा सुरू ठेवण्यात आहेत.  लोकसभेत सादर करण्यात आलेलं विधेयक आम्हाला मान्य नाही. हे विधेयक लोकशाही विरोधात आहे. या विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट होईल तसेच विधेयकामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना मुक्त संचार मिळेल. वैद्यकीय शिक्षण परवडणाऱ्या दरात मिळणार नाही. आम्ही कोणत्याही पॅथीच्या विरोधात नाही, पण यामध्ये पारदर्शकता हवी. आमचा संप सामान्य रुग्णांसाठी आहे. सरकारने यावर चर्चा करावी अशी आमची मागणी आहे.

राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे १० हजारपेक्षा जास्त डॉक्टर मंगळवार सकाळपासून संपावर आहेत. काही दिवसांपूर्वीच इंडियन मेडिकल असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी मागण्या मान्य करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात डॉक्टर विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे.