विरार : वार्ताहर
मित्राला काही काम निघाल्याने मित्राच्या विनंतीनुसार सुटीच्या दिवशीही काम करणे वसईचे रहिवासी बिंदालाल बाबू यांच्या जिवावर बेतले. या घटनेमुळे बाबू यांच्या कुटुंबीयांसह वसई तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ओएनजीसीच्या अधिकार्यांना घेऊन निघालेले पवन हंस हेलिकॉप्टर शनिवारी जुहूच्या समुद्रात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टर मधील सातही जण मरण पावले. यात वसईचे रहिवासी बिंदालाल बाबू यांचाही समावेश आहे.
बिंदालाल बाबू यांची सुट्टी होती. पण त्यांच्या मित्राला काही काम निघाल्याने त्यांनी बिंदालाल बाबू यांना तुम्ही आज ड्युटीवर जा, अशी विनंती केली. मित्रासाठी ते कामावर गेले, मात्र त्यांचा दुर्घटनेत अंत झाला. याआधीही 2005 मध्ये ओएनजीसीच्या फ्लॅटफॉर्मवर आग लागली होती. त्यातही बिंदालाल बाबू सापडले होते. मात्र, त्यावेळी मृत्यूला चकवण्यात ते यशस्वी झाले आणि सुखरूप घरी परतले. मात्र, शनिवारी त्यांना काळाला चकवा देण्यात यश आले नाही.