Sat, Sep 19, 2020 07:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेडिओलॉजिस्टला तात्काळ कामावर घ्या, हायकोर्टाचे एमजी रुग्णालयाला आदेश

रेडिओलॉजिस्टला तात्काळ कामावर घ्या, हायकोर्टाचे एमजी रुग्णालयाला आदेश

Last Updated: Jul 06 2020 9:15PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

परेल येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरला अचानक सेवेतून मुक्त केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. रेडिओलॉजिस्टची सेवा समाप्त का करण्यात आली. असा सवाल न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठाने उपस्थित करून रुग्णालयाला यांचा जाब विचारत त्या रेडिओलॉजिस्टला ताबडतोब कामावर घ्या असे आदेश दिले.

१९९० पासून डॉ. निमिष शहा हे रेडिओलॉजिस्ट पदावर काम करत आहे. १९९६ साली त्यांना विभागप्रमुख करण्यात आले. ऑगस्ट २०१८ रोजी राज्य सरकारने ग्रेड ए च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आणि जुलै २०१९ रोजी ६२ वर्षे केले. १९ सप्टेंबर २०१९ रोजी रुग्णालयाने एक परिपत्रक जारी करून ऑगस्ट २०१९ मधील जीआरची अंमलबजावणी केली. ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा वाढवण्यासंदर्भात बोर्डाने कोणताही निर्णय घेतला नसल्याबाबत ३० जून रोजी रुग्णालय प्रशासनाने परिपत्रक काढले व ५८ वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना निवृत्त करण्याचे आदेश दिले. या विरोधात डॉ. शहा यांनी अॅड. अथर्व दांडेकर यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.शंकर रेवणकर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. बोर्डाची केवळ बैठक झाली नसल्यामुळे शाह यांना निवृत्त करण्यात आले का ? असा सवाल केला. त्यावर रेवणकर यांनी सध्या रेडिओलॉजिस्ट नसले तरी हे काम निवासी डॉक्टर करत असल्याचे सांगताच न्यायालयाने संताप व्यक्त करत  रेडिओलॉजिस्टला तातडीने कामावर हजर करून घ्या, असे आदेश दिले

 "