Thu, May 28, 2020 17:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदी, माल्ल्यासाठी हायफाय कारागृह

नीरव मोदी, माल्ल्यासाठी हायफाय कारागृह

Last Updated: Dec 03 2019 1:16AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भारतातील विविध बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांचे प्रत्यार्पण झाल्यास त्यांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त कारागृह कक्ष बांधण्याचा विचार तुरुंग विभागाने केला आहे. त्यासाठी इस्त्रायल आणि लंडनमधील कारागृहांचा अभ्यास करण्यासाठी तुरुंग विभागाने राज्याच्या गृह विभागाला पत्र पाठवले आहे.

विदेशात पळून गेलेले गुन्हेगार भारतात चांगले तुरुंग नाहीत. मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते असे आरोप करत तेथील न्यायालयांमार्फत प्रत्यार्पण रोखून धरतात. मोदी व माल्ल्याच्या बाबतीत असा प्रकार होऊ नये, यासाठी इस्त्रायल आणि लंडनमधील तुरुंगांची पाहणी करून त्या धर्तीवर भारतीय कारागृहांमध्ये सुधारणा करण्याचा विचार कारागृह प्रशासनाने केला आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह प्रशासन) दीपक पांडे यांनी 5 सप्टेंबर 2019 रोजी गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना पत्र पाठवले आहे. या पत्रात आर्थिक घोटाळ्यातील आरोपी विजय माल्या आणि नीरव मोदी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तुरुंग प्रशासनाला भारतीय कारागृहे विजय माल्या आणि नीरव मोदीसारख्या हायप्रोफाईल गुन्हेगारांसाठी योग्य वाटत नाहीत. असे गुन्हेगार भारतीय कारागृहांच्या खराब स्थितीचा बहाणा करून प्रत्यार्पणास विरोध दर्शवतात. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून परदेशात आर्थिक गुन्हेगारांना कशा पध्दतीने ठेवले जाते याची या अधिकार्‍यांना पाहणी आणि तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. त्यासाठी तुरुंग अधिकार्‍यांचे एक पथक इस्त्रायल आणि लंडनमधील कारागृहांची पाहणी करु इच्छित आहे. त्यासाठी गृह विभागाने परवानगी द्यावी, अशी विनंती या पत्रात केली आहे.

विजय माल्याच्या वकिलाने युकेच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयातील सुनावणीदरम्यान भारतीय कारागृहांच्या स्थितीचा अहवाल सादर केला होता. यासंदर्भात वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मुंबईतील आर्थररोड कारागृहाचा व्हीडीओ इंग्लंडला पाठवला होता. कारागृहाची सबब पुढे करुन मोदी व माल्ल्याचे प्रत्यार्पण थांबू नये, या हेतूने हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनातील सूत्रांनी दिली.