Mon, Jun 01, 2020 00:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेजेमधील हृदयशस्त्रक्रिया सहा महिन्यांपासून बंद

जेजेमधील हृदयशस्त्रक्रिया सहा महिन्यांपासून बंद

Last Updated: Feb 14 2020 2:09AM
मुंबई ः पुढारी डेस्क

आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रुग्णांचे आशास्थान मानल्या गेलेल्या जे जे रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया 14 जून 2019 पासून बंद करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय उपकरणे पुरवणार्‍या कंत्राटदारांचे तीन कोटी रुपये थकले आहेत. तसेच जे जे रुग्णालयासह कामा, जी.टी. आणि सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयांना केला जाणारा औषधांचा पुरवठा जवळपास 40 केमिस्टनी बंद केल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या केमिस्टची जवळपास 60 कोटी रुपयांची बिले थकल्याने त्यांनी औषधे न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीमुळे रुग्णांची अक्षरशः परवड सुरू झाली आहे.  

या केमिस्टनी आपले थकलेले पैसे मिळावेत यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना साकडे घातले आहे. यापैकी अनेक केमिस्टनी आपले राहते घर गहाण टाकून पैसे उभे करत व्यवसाय सुरू ठेवला आहे. या रुग्णालयांना मिळणार्‍या एकूण निधीपैकी केवळ 10 टक्के रक्कम निविदा न काढता थेट खरेदी करण्यात येणार्‍या औषध आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी उपलब्ध होत असते. ही रक्कम अपुरी असल्यामुळे सर्वच पुरवठादारांचे पैसे एकाच वेळी देणे शक्य होत नाही. त्यामुळे ही रक्कम थकत जाते. 

यासंदर्भात बोलताना दादर येथील एका केमिस्टने सांगितले की, या रुग्णालयांकडून आम्हाला औषधे आणि उपकरणांची यादी येते. त्याबरहुकूम आम्ही या गोष्टींचा काटेकोरपणे पुरवठा करतो. रुग्णालयांना थेट औषध खरेदीसाठी मंजूर असणार्‍या 10 टक्के 

रकमेशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्ही पुरवलेल्या औषधाचे पैसे आम्हाला मिळावेत इतकीच आमची अपेक्षा आहे. थकलेली रक्कम मिळावी यासाठी केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. पण तेथेही त्यांच्या पदरात ठोस असे काही पडले नाही. 

जे जे रुग्णालयासमोर असणार्‍या शीतल फार्माचे जे जे कडून 80 लाख रुपये तर सेंट जॉर्जकडून तब्बल दीड कोटी रुपये येणे बाकी आहे. मी माझे घर गहाण टाकून कर्ज घेतले आहे. त्यावर माझे दुकान सुरू आहे, असे या शीतल फार्माचे दीपेश शहा यांनी सांगितले. भायखळा येथील राज गोसर या केमिस्टचीही जवळपास अशीच स्थिती आहे. आम्ही रस्त्यावर येणे बाकी आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान या समस्येबद्दल बोलताना जे जे मधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणाले, बर्‍याचदा रुग्णालयांकडे अनेक औषधे उपलब्ध नसतात. ती स्थानिक औषध विक्रेत्यांकडून घ्यावी लागतात. त्यांचे पैसे थकले असतील आणि त्यांनी पुरवठा बंद करायचा निर्णय घेतल्यास निश्चितच अडचण येऊ शकते.