Thu, Jun 24, 2021 10:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये दाखल

हर्षवर्धन पाटलांच्या हातात भाजपचा झेंडा

Published On: Sep 11 2019 11:23AM | Last Updated: Sep 11 2019 3:55PM

हर्षवर्धन पाटील मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का आहे. मी कोणतीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही, असे  हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना इंदापूरमधून भाजपची उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्याचवेळी भाजप प्रवेशाचे संकेतही दिले होते. त्यानुसार त्यांनी चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही पाच वर्षे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाची वाट पाहत होतो. मात्र, त्यांनी आता योग्य वेळी प्रवेश केला आहे.  इंदापूर हा जसा तुमचा परिवार आहे, तसा भाजप हा एक परिवार आहे. हा पक्ष कोणत्याही परिवाराचा नाही तर पक्ष हाच एक परिवार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात अत्यंत प्रभावी मंत्री म्हणून काम केले. त्यांच्यासारखा अनुभवी नेता पक्षात आल्याने भाजपला आणखी बळ मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हर्षवर्धन पाटील लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये  आले असते तर एव्हाना खासदार झाले असते. सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला असता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. हा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा निकाल जनतेने ठरविला होता. परंतु,  काहींच्या मनात शंका होती. हर्षवर्धन पाटील यांनीही त्यावेळी म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश केला नसेल. मात्र, आम्हाला अजिबात शंका नव्हती. आता विधानसभेतही तेच चित्र आहे. म्हणूनच अन्य पक्षांतील नेत्यांचा ओढा भाजपकडे आहे.

...तर सुप्रिया सुळेंना घरी पाठविले असते ः चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला असता तर बारामतीबाबतचा संकल्प पूर्ण झाला असता आणि ते खासदार झाले असते. आम्ही ठरवले होते माढा, पवारांना पाडा. मात्र पवारांनी तेथून वेळीच माघार घेतली. हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रिया सुळे यांनाही घरी पाठवले असते. मात्र हर्षवर्धन पाटील हे  हुशार राजकारणी आहेत. लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू, असे त्यांनी तेव्हा ठरवले होते. नाहीतर ते तेव्हाच भाजपत आले असते.

राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येणार असून ते मोठ्या बहुमताने येणार आहे. आधी आम्ही घोषणा केली होती की, अब की बार 220 पार. आता ही घोषणा मागे पडली आहे. आता यापेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही ते म्हणाले.

भाजपशिवाय पर्याय नाही : हर्षवर्धन पाटील 

भाजपमध्ये प्रवेश करणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसांत घटनेचे कलम 370 रद्द करण्यासोबतच अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचे नेतृत्व केले आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्त्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आपण भाजपमध्ये प्रवेश करताना कोणतीही अट घातलेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे सरकार आल्यानंतर अनेकांना झोप लागत नव्हती. मला मात्र शांत झोप येत असे. कारण आपण चुकीचे कोणतेही काम केलेलेच नाही. प्रामाणिकपणाने जे काही केले, त्यातून लोकांचे प्रेम मिळवले.माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सर्वांना माहिती आहे. आपण मित्र आणि शत्रू बदलू शकतो. पण शेजारी बदलू शकत नाही. तुमच्या मनात आले तर आमच्या जिल्ह्यात धो धो पाणी येईल, असे सांगत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्नही मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबत हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील, पुत्र राजवर्धन पाटील आणि त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.

आता मीच भाजपमध्ये आलोय 

भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्ते वगळून सर्वांचा उल्लेख केला. त्यामुळे एका भाजप कार्यकर्त्याने त्यांना आम्हीही आलोय, अशी आठवण करून दिली. त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी, आता मीच भाजपत आलोय. काय विश्वास पटेना की काय, असा सवाल करताच एकच हशा पिकला.