Wed, Aug 12, 2020 21:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिरवीगार मुंबई १० वर्षांत झाली उजाड

हिरवीगार मुंबई १० वर्षांत झाली उजाड

Last Updated: Jan 15 2020 1:46AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गेल्या 10 वर्षांमध्ये मुंबईला भकास करण्यात जवळपास सर्वच घटकांनी हातभार लावला आहे. यात सरकारच्या दुर्लक्षापासून ते विकासकांपर्यंतच्या सर्वांचा समावेश आहे. या दहा वर्षांत मुंबईचा 23 टक्के हरित पट्टा नष्ट झाला आहे. याचा मोठा फटका शहराच्या पश्‍चिम उपनगरांना बसला आहे. तेथे या हानीचे प्रमाण जवळपास 60 टक्के आहे. मुंबई आयआयटीने  केलेल्या अभ्यासानंतर ही बाब पुढे आली आहे. 

2001 ते 2011 या दरम्यान मुंबईत 88 प्रभागांतील झाडांची बेसुमार कत्तल झाली. विशेषतः पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि निवासी प्रकल्प उभे राहिले. त्यासाठी झाडे तोडण्यात आलीच, शिवाय खारफुटीचीही मोठ्या प्रमाणात तोड झाली. 

गोरेगावला या वृक्षतोडीचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. 2001 मध्ये या भागात 62.5 टक्के हरित पट्टा होता. तो 2011 मध्ये केवळ 17.4 टक्के इतकाच उरला. अंधेरी पश्‍चिमेला असलेला हरित पट्टा 63 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आला, तर मालाड पश्‍चिममध्ये 62 टक्के असलेला हरित पट्टा 10 वर्षांत 19.5 टक्के इतकाच उरला. त्याचबरोबर कांदिवली आणि विलेपार्ले येथेही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली.केवळ पश्‍चिम उपनगरेच नव्हे, तर मुलुंड आणि घाटकोपरसारख्या पूर्व उपनगरांमध्येदेखील हा हरित पट्टा प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाला. 

याउलट मुंबईत ज्याठिकाणी प्रचंड दाटीवाटीची लोकवस्ती आहे त्या दादर, सायन आणि माटुंगा येथे हा हरित पट्टा जवळपास तसाच राहिला. त्यात अगदी नगण्य प्रमाणात घट झालेली आढळली.  शहरातील काही भागांमध्ये हा हरित पट्टा वाढलेला आढळला. वाळकेश्‍वरसारख्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली. दुसरीकडे या भागातील लोकसंख्या किंचित कमी झालेली आढळली. त्यामुळे दरडोई असलेले हरित पट्ट्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले. 

मुंबई आयआयटीच्या या अहवालानुसार मुंबईत असणारी झाडेझुडपे, उद्यानामधील झाडे यांची या काळात बेसुमार तोड झाली. त्यामुळे हा वेग असाच राहिला तर राहिलेला हरित पट्टा नष्ट होईल, अशी भीती व्यक्‍त करण्यात आली. हे रोखायचे असेल तर वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा, असा उपाय सुचवण्यात आला आहे.