Sat, May 30, 2020 01:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोने @ ४३०००

सोने @ ४३०००

Last Updated: Feb 20 2020 3:50PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

सराफ बाजारपेठेत गुरुवारी विक्रमी भाव खात सोने प्रती 10 ग्रॅम 42,763 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा दर प्रतिकिलो  47,763 रुपये राहिला. सोने दोन-तीन महिन्यांत 45 हजारांवर देखील पोहचू शकते, असा अंदाज सराफांनी व्यक्त केला.  

कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीत गुंतवणूक झपाट्याने वाढू शकते. परिणामी, एप्रिल व मे महिन्यात सोन्याचे दर 44 ते 45 हजारांच्या घरात पोहचू शकतात. मुंबईतील सराफा बाजारात गुरुवारी सकाळी वस्तू व सेवा करासह सोन्याचे प्रतितोळा दर 42,707 रुपयांवर होते ते सायंकाळपर्यंत 43 हजार 080 रुपयांवर पोहोचले. येत्या 4 महिन्यांत दरांमध्ये आणखी वाढ होईल, असा अंदाज मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे कुमार जैन यांनी व्यक्त केला.

गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत सोन्याचा मूळ दर 41,853  होता. त्यावर आकारला जाणारा जीएसटी विचारात घेतला असता हा भाव 42 हजार रुपयांवर गेला. जानेवारी महिन्यापासून सोने सातत्याने 41 हजारांवर कमीअधिक व्यवसाय करत आहे. 1 जानेवारी रोजी (39,850 हा सोन्याचा राज्यातील भाव) वगळता त्यानंतर सोने 40-41 हजारांवरच राहिले आहे.

चीनमधील कोरोना व्हायरसच्या साथीचा सोन्यालाही फटका बसला आहे. चीनमधून सोन्याचे दागिने किंवा गोल्ड प्लेटेड दागिने भारतात मोठ्या प्रमाणात आयात होतात. कोरोनामुळे भारतासह जगभरातून चीनसोबतच्या व्यापारावर निर्बंध आल्याने सोने आणि चांदी अशा मौल्यवान धातूंमध्ये इतर देशांत गुंतवणूक करण्याचा निर्णय ग्राहकांनी घेतल्याने दर वाढू लागले आहेत. अमेरिकेत सोन्याचा दर हा 1,600 डॉलर्सवर पोहचला आहे. इंग्लंडमध्येही सोन्याचे दर चढे आहेत. याशिवाय जागतिक मंदी आणि लग्नसराई ही दोन कारणेही सोने महागाईमागे आहेत. मंदीत गुंतवणुकीला सोने बरे असा जागतिक मतप्रवाह आहे. त्यात लग्नसराईमुळेही सोने, चांदीचे दर वाढले. ही दरवाढ भारतातच नव्हे तर जगभर असल्याचे सराफांचे म्हणणे आहे. 

हिरेही चमकले...

जागतिक बाजारात उलथा-पालथ झाल्याने सराफा बाजाराप्रमाणेच हिरे बाजारालाही चमक आल्याचे हिरे व्यापारी जिग्नेश मेहता यांनी सांगितले. मेहता म्हणाले की, युद्धजन्य परिस्थिती किंवा मोठे आजार पसरल्यावर गुंतवणुकदारांचा ओढा सराफा आणि हिरे व्यापाराकडे वळतो. कोरोना व्हायरसमुळे हिरे व्यापारातील तेजी वाढली आहे. तूर्तास हिरे व्यापार्यांना सोन्याच्या तुलनेत ग्राहकांमध्ये अधिक विश्वास निर्माण करावा लागेल. तसे झाल्यास हिरे विक्रीत अनेक संधी उपलब्ध असून अधिकाधिक गुंतवणुकीला वाव मिळू शकतो.