Wed, May 22, 2019 21:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एल्गारप्रकरणी अटक केलेल्यांविरोधात पुरावे द्या!

एल्गारप्रकरणी अटक केलेल्यांविरोधात पुरावे द्या!

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पोलीसांनी माओवादी ठरविलेले सुधीर ढवळे यांचा अपवाद वगळता इतर पाच जणांचा एल्गारपरिषदेशी कोणताही संबंध नाही. पोलीसांकडे याबाबत पुरावे असल्यास ते सादर करावेत, असे आव्हान भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख केलेला कॉम्रेड प्रकाश म्हणजे मीच असा प्रसार करण्यात आला. पण हा कॉम्रेड प्रकाश गुवाहाटीमधील असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मात्र, हे  पत्र प्रसारमाध्यमांकडे कसे पोहोचले, असा सवालही त्यांनी उपस्थित करत सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

मुंबईतील पक्षाच्या मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत आणि न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी आपणच एल्गारपरिषद आयोजित केल्याचे उघडपणे सांगत आहेत. त्यामुळे परिषदेच्या आयोजनात सहभागी असणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करत बसण्यापेक्षा सरकारने कोळसे - पाटील आणि सावंत यांच्यावर कारवाई करून दाखवावी.

देशात दंगली घडवुन आणण्यासाठी सत्ताधायांनी मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. पण हा समाज शांत राहिल्याने सत्ताधार्‍यांचे मनसुबे उधळले गेले. आता आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी विचारधारांमध्ये झुंज लावून देशात अराजकसदृश परिस्थिती निर्माण करुन आणिबाणी लागू करण्याचा त्यांचा डाव आहे. आणिबाणीआड लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकरांनी केला.