Thu, Aug 06, 2020 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा नव्याने मूर्ती घडवणार नाही

चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा नव्याने मूर्ती घडवणार नाही

Last Updated: Jul 03 2020 6:10PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गेल्यावर्षी शतकोत्सव साजरा केलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीची नवी मूर्ती घडवणार नसल्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे. त्याऐवजी मंडळाच्या देव्हाऱ्यात असलेल्या चिंतामणीच्या पारंपरिक चांदीच्या मूर्तीचे १० दिवस पूजन करण्यात येईल. तसेच थेट दर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करून यंदाचे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून साजरा करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली.

मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितले की, यंदा १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना, पूजन हा धार्मिक विषय आहे. याशिवाय भक्तांच्या भावनांचा, भक्तीचा आदर करत मंडळाने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंडळाने चिंतामणीचा आगमन सोहळा, पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला होता.

मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने मान्य केले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची आहे, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना, सद्य परिस्थितीत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त, शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा, जनतेचे आरोग्य या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून नवी मूर्ती न घडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना केली जाईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले की, मंडळाने हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांना उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे वाटप मंडळातर्फे केले जाईल. याशिवाय कोरोनाशी दोन हात करणाऱ्या १०१ कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे.

या उपक्रमांमध्ये कार्यकर्ते व्यस्त असल्याने यंदा थेट दर्शनही बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी चिंतामणीच्या भक्तांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध असेल. परिणामी, भक्तांनी गणेशोत्सव काळात चिंतामणीच्या दर्शनासाठी चिंचपोकळी येथे गर्दी करू नये, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

विसर्जन सोहळाही रद्द

आगमन सोहळा रद्द कऱणाऱ्या चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने यंदा चांदीची मूर्ती बसवत असल्याचे सांगत विसर्जन सोहळाही रदद केल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट चिंतामणीच्या मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे. विभागातील घरगुती गणेश मूर्तींना विसर्जनासाठी हा तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहे