Tue, Sep 22, 2020 01:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा श्रेष्ठ : हायकोर्ट

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा श्रेष्ठ : हायकोर्ट

Last Updated: Feb 15 2020 1:51AM
मुंबई : प्रतिनिधी 
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एखाद्याच्या प्रतिष्ठेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मात्र सोशल मीडियावर मांडलेल्या मताबाबत जनमानस प्रभावित होत असेल तर त्या मतांनाही विश्वासाचे बंधन असायला हवे, असे स्पष्ट करत व्हिडीओ ब्लॉगर असलेल्या अभिजित भन्साली यांना हायकोर्टाने दिलासा दिला. यूट्यूबवर पॅराशूट तेलाबाबत टाकलेली व्हिडीओ पोस्ट हटवण्याच्या आदेशांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती देताना मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने अभिजीत यांना आपल्या त्या पोस्टमध्ये दोन आठवड्यांत काही बदल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.

व्हिडीओ ब्लॉगर असलेल्या अभिजित भन्साली यांनी यूट्यूबवर पॅराशूट खोबरेल तेलाविरोधात टीकात्मक, विरोधाभास दाखवणारा व्हिडीओ अपलोड करून इतर तेल आणि पॅराशूट तेलाची तुलना केली.त्यात  दोन्ही तेलाच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवून त्यांच्या शुद्धतेची आणि रंगातील बदलाची तुलना केली. तसेच व्हिडीओतून त्याने पॅराशूट तेल केसांसाठी, त्वचेसाठी आणि इतर वापरासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. त्या विरोधात मारीको कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. व्हिडीओतून कंपनीच्या उत्पादनाविरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप करत त्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान  होत आसल्यामुळे तो व्हिडीओ काढून टाकण्याची मागणी केली.  याची दखल घेत एकसदस्य न्यायालयाने भन्साळी यांना व्हिडीओ मागे घेण्याचे निर्देश दिले. त्या विरोधात भन्साली यांनी  उच्च न्यायालयात अपील दाखल केले त्यावर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सोशल मीडियाचा वापर सावधगिरीने करायला हवा, सोशल मीडियावर व्यक्त केल्या जाणार्‍या मतांचा समाजावर प्रभाव होत असतो, त्यामुळे त्याला विश्वासार्हतेचंही बंधन असायला हवे. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाचे असते, असे स्पष्ट मत व्यक्त  न्यायालयाने व्यक्त केले.

मानहानीच्या दाव्यातील तरतुदीनुसार कोणीही चुकीची माहिती किंवा मत व्यक्त करु नये आणि त्या व्यक्तीने व्यक्त केलेले मत हे वास्तविक असेलच असे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा हे दोन्ही मूलभूत अधिकार असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अधिक उच्च असते, असे मतही यावेळी हायकोर्टाने व्यक्त करून पॅराशूट तेलाचा अपलोड केलेला व्हिडीओ हटवण्याच्या निर्देशांना स्थगिती दिली.

 "