Sun, Sep 20, 2020 06:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चाळीशीतील सनदी अधिकार्‍यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक 

चाळीशीतील सनदी अधिकार्‍यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक 

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:39AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांना दरवर्षी कार्यमूल्यांकन अहवाल देणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. या अहवालासोबतच वयाची 40 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे वयोमान झालेल्यांना या वर्षीपासून वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करणे सामान्य प्रशासन विभागाने बंधनकारक केले आहे. रक्तदाब, मधुमेह, मूत्रविकार, हृदयविकार, कर्करोग, नेत्रविकार आदी आजरांशी संबंधित सर्व चाचण्या करून घ्याव्यात, अशा सूचना सर्व अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य संवर्गातील भारतीय प्रशासन सेवेतील ज्या अधिकार्‍यांनी 31 मार्च 2017 रोजी वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्या अधिकार्‍यांचे त्यापेक्षा जास्त वयोमान झाले असेल अशा सर्वांनी त्यांच्या कार्यमूल्यांकन अहवालासोबत वैद्यकीत तपासणीचा अहवाल दरवर्षी न चुकता सादर करावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत.

वैद्यकीय तपासणीसाठी शासनाने काही खासगी रुग्णालये निश्‍चित केली असून त्या ठिकाणी जाऊन सर्व तपासण्या एका दिवसात किंवा जास्तीत जास्त दोन दिवसांत करून घ्याव्यात. यासाठी येणारा खर्च आधी स्वत: करून संबंधित कार्यालयाकडून त्याची प्रतिपूर्ती मिळवावी. वैद्यकीय तपासणीची प्रतिपूर्ती दरवर्षी देण्यात येणार नाही, तर दोन वर्षातून एकदाच देण्यात येणार असल्याचे यासंदर्भातील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.