Wed, Apr 01, 2020 07:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २६/११ चा हल्ला ‘हिंदू दहशतवाद’ ठरवण्याचा तोयबाचा कट होता!

२६/११ चा हल्ला ‘हिंदू दहशतवाद’ ठरवण्याचा तोयबाचा कट होता!

Last Updated: Feb 19 2020 1:53AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

26/11 चा मुंबईवरील हल्ला हा ‘हिंदू दहशतवाद’ भासवण्याचा पूर्ण कट लष्कर-ए-तोयबाने रचला होता. तो तडीस गेला असता तर अजमल कसाब हा बंगळुरूचा ‘समीर चौधरी’ ठरला असता आणि देशभर मग कथित हिंदू दहशतवादाच्या नावाने गळे काढणार्‍या हेडलाईन्स झळकल्या असत्या... असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अन् 26/11 च्या हल्ल्याचे तपास अधिकारी राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. 

‘लेट मी से इट नाऊ’ या शीर्षकाचे आत्मचरित्र मारिया यांनी सोमवारी प्रकाशित केले. या आत्मचरित्रात 26/11 च्या हल्ल्यावर आणि त्यामागील कटकारस्थानांवर प्रकाशझोत टाकताना या हल्ल्याशी डॉन दाऊदचे कनेक्शनही मारिया यांनी प्रथमच समोर आणले आहे. हल्लेखोरांपैकी एकमेव अतिरेकी अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला. हा एकच पुरावा भारताच्या हाती होता. तो नष्ट करण्यासाठी कसाबला तुरुंगातच खतम करण्याची जबाबदारी दाऊद गँगवर टाकण्यात आली होती. दाऊदने सारे प्रयत्न करून पाहिले. मात्र कसाब काही त्यांच्या हाती लागला नाही. 

मारिया म्हणतात, 26/11 चा मुंबईवरील हल्ला हा लष्कर-ए-तोयबाचा हिंदू दहशतवाद ठरवण्याचा प्लॅन होता. या प्लॅनप्रमाणे सार्‍या गोष्टी तडीस गेल्या असत्या तर कसाब हा कसाब म्हणून नव्हे तर हाताला पवित्र भगवा धागा बांधलेला बंगळुरूचा समीर चौधरी म्हणून ठार झाल्याचे माध्यमांनी लिहिले असते आणि ओघानेच या हल्ल्याला हिंदू दहशतवाद जबाबदार असल्याच्या बातम्या दिल्या असत्या. त्यानुसार लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठवलेल्या या अतिरेक्यांसोबत बनावट ओळखपत्रे भारतीय पत्त्यांसह दिलेली होती. 

मारिया आपल्या आत्मचरित्रात लिहितात, तोयबाचा हिंदू दहशतवादाचा प्लॅन यशस्वी झाला असता तर हिंदू अतिरेक्यांनी मुंबईवर कसा हल्ला चढवला हे अक्षरश: किंचाळत सांगणार्‍या हेडलाईन्स वृत्तपत्रांनी दिल्या असत्या. त्यांच्याही पुढे जाऊन दूरचित्रवाहिन्यांच्या पत्रकारांनी या कथित समीर चौधरीच्या कुटुंबीयांच्या, शेजार्‍यापाजार्‍यांच्या मुलाखती घ्यायला रांग लावली असती. पण अरेरेे! जसा कट रचला तसे काही घडले नाही. मुंबईवर हल्ला करणारा अजमल आमीर कसाब हा पाकिस्तानच्या फरीदकोटवरून आल्याचेच जगासमोर सिद्ध झाले. छोट्या-मोठ्या चोर्‍यामार्‍या करण्यासाठी खरे तर कसाब लष्कर-ए-तोयबात भरती झाला होता. त्याचा तोयबाच्या जिहादशी काहीही संबंध नव्हता. मात्र नंतर त्याचा पार बुद्धिभेद करण्यात आला. भारतात मुस्लिमांना कुठेही नमाज अदा करू दिली जात नाही, असे त्याला भरविण्यात आले. पुढे अटक झाल्यानंतर मेट्रो सिनेमाजवळील एका मशिदीत त्याला नेण्यात आले तेव्हा तेथील परिस्थिती पाहून कसाब चकित झाला  होता, अशी आठवण नोंदवत मारिया लिहितात, मुंबईवर हल्ला चढवण्यापूर्वी कसाबला तोयबाने सव्वा लाख रुपये दिले आणि आठवडाभराची रजाही मंजूर केली होती. ही रक्कम कसाबने कुटुंबाकडे बहिणीच्या लग्नासाठी दिली. 

166 लोकांचे बळी घेणार्‍या 26/11 च्या हल्ल्यात 2008 साली कसाब जिवंत पकडला गेला. 21 नोव्हेंबर 2012 ला त्याला फासावर लटकवण्यात आले. आता 8 वर्षांनंतर त्या हल्ल्याचा तपास करणारे राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘हिंदू दहशतवादाचा तोयबाचा कट’ समोर आणलाच त्याचबरोबर असाच प्रयत्न केंद्रीय गुप्तचरांचाही होता, असा गौप्यस्फोट केल्याने नवे राजकीय वादळ उभे राहण्याची चिन्हे आहेत. 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मारियांच्या आत्मचरित्राची आणि त्यातील गौप्यस्फोटांची दखल घेत सांगितले की, मारिया हे आजच का हे सांगत आहेत. पोलीस आयुक्त असतानाच ते या सर्व बाबी उघड करू शकले असते. पोलीस सेवेच्या नियमानुसार जर कुठल्या अधिकार्‍याकडे काही माहिती असेल तर ती त्याने उघड करणे बंधनकारक असते. शिवाय हिंदू दहशतवादाचे खोटे चित्र निर्माण करण्याचा गेम प्लॅन तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारचा होताच. मात्र या गेम प्लॅनला जनतेने 2014  आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सडेतोड उत्तर दिले आहे. दहशतवादाला कोणतेही कारण नसते आणि दहशतवादी होण्याचेही कुठले कारण असू शकत नाही. हिंदू दहशतवादाच्या खोट्या केसेस उभ्या करून अपप्रचार करणार्‍या काँग्रेसच्या कारनाम्यांचा आमचे सरकार तीव्र निषेध करते.