मराठा आरक्षण सुनावणीसाठी पाच सदस्यांचे घटनापीठ

Last Updated: Dec 05 2020 12:54AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या अर्जावर पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता या घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  शुक्रवारी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. या स्थगिती आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याची विनंती सरन्यायाधीश शरद बोबडे यांना करण्यात आली होती. राज्य सरकारकडून पहिला अर्ज 7 ऑक्टोबर, दुसरा अर्ज 28 ऑक्टोबर, तिसरा अर्ज 2 नोव्हेंबर तर चौथा अर्ज 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही विशद केली होती.

शासनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंतीही रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले होते. परंतु, यासंदर्भात निर्णय झालेला नव्हता. अखेर घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांच्या मुद्द्यावर मराठा समाजाने विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नसला तरी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. विशेषतः मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेशात अधिसंख्य जागा निर्माण करून प्रवेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिवेशन तोंडावर असताना घटनापीठ स्थापन झाल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.