Tue, May 26, 2020 16:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रावर मत्स्य दुष्काळाचे सावट!

महाराष्ट्रावर मत्स्य दुष्काळाचे सावट!

Last Updated: Feb 14 2020 2:08AM
मुंबई: चंदन शिरवाळे

पश्चिम समुद्रकिनार्‍याच्या दहा नॉटिकल अंतरापर्यंत विविध प्रकारच्या प्लास्टिकचा साचलेला थर, समुद्र किनार्‍यालगतच्या तिवरांची कत्तल, दूषित व रासायनिक पाणी व मत्स्यबीज टंचाईमुळे माशांच्या विविध प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहेत. आतापर्यंत 32 प्रजाती नष्ट झाल्या असून भविष्यात आणखी काही मत्स्य प्रकार नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे महाराष्ट्रावर मत्स्य दुष्काळाचे सावट आले आहे.

कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील मत्स्य व्यवसाय संकटांच्या जाळ्यात अडकला आहे. शेतकर्‍याप्रमाणे आता मच्छीमार बांधवसुद्धा सावकारांच्या दावणीला बांधला गेला आहे. मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या समुद्र किनारी जिल्ह्यांमधील सुमारे 22 लाख कोळीबांधव मत्स्य व्यवसायात आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पारंपरिक व्यवसायावर उपजीविका करणारा हा वर्ग आता नैसर्गिक आपत्ती आणि कृत्रिम संकटांमुळे हवालदिल झाला आहे. परप्रांतीय मच्छीमारांचे आक्रमण आणि रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी नद्या-खाड्यांद्वारे समुद्रात येत असल्याने विविध समुद्रजीवांसह माशांच्या अनेक प्रजातीही कमी होऊ लागल्या आहेत.

समुद्र किनार्‍यालगतच्या तिवरांची (मँग्रोज) मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. त्या ठिकाणी झोपड्या आणि  अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याने प्रजोत्पादनासाठी माशांना आता जागाच उरलेली नाही. परप्रांतीय मच्छीमार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या किनार्‍यावर पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करत आहेत. या जाळ्यामध्ये लहान मासे अडकत असल्यामुळे समुद्रातील मोठ्या माशांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणार्‍या कोळी बांधवांच्या जाळ्यात कमी प्रमाणात मासळी सापडत असल्यामुळे हा वर्ग चिंतेने ग्रासला आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी 1976-77 मध्ये शेतकर्‍यांचे जिल्हा बँकांकडील 10 हजार रुपयांचे कर्ज माफ केले होते. तेव्हांपासून मासेमारांचे कोणतेही कर्ज सरकारने माफ केले नाही. कर्जाचा आकडा फुगू लागल्याने एकेकाळी सुख, समाधान आणि ऐश्वर्याने लकलकणारे कोळीवाडे आता चिंतेने काळवंडू लागले आहेत.

मच्छीमारांवर यावर्षी निसर्गाने जणू प्रकोप केला आहे. मासेमारी हंगामापासून सतत लागलेला पाऊस आणि अरबी समुद्रात क्यार आणि महावादळांमुळे पश्चिम किनार्‍यावरील मासेमारी 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पूर्णतः ठप्प झाली होती. अद्यापही  मच्छीमारांच्या 60 टक्के बोटी बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. 

बोटींमध्ये भरलेले डिझेल, बर्फ,  रेशनिंग, पाणी व इतर किरकोळ सामानाच्या खर्चाची भरपाई तसेच खलाशांचे पालनपोषण करणे सामान्य मच्छीमारांना अशक्यप्राय झाले आहे. सध्या केवळ 40 टक्के बोटी मासेमारीसाठी जात असल्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगळता उर्वरित कोकणपट्ट्यामध्ये मासळी टंचाई आहे. मत्स्यप्रेमींना जादा दराने मासे खरेदी करावे लागत आहेत.    
    (क्रमशः)