Sat, Apr 10, 2021 20:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्र सरकारकडून कोरोना लॉकडाऊनवर १ लाख ७० हजार कोटींचा उतारा!

केंद्र सरकारकडून कोरोना लॉकडाऊनवर १ लाख ७० हजार कोटींचा उतारा!

Last Updated: Mar 26 2020 2:49PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना रोगाचा प्रकोप वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन या पॅकेजची घोषणा केली. कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी प्रधानमंत्री अन्न योजनेंतर्गत ५ किलो अतिरिक्त गहू अथवा तांदूळ पुढील तीन महिन्यासाठी दिले जाणार असून १ किलो डाळही दिली जाणार आहे. ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असे सीतारामन यांनी सांगितले.

अन्नधान्याचा पुरेसा साठा देशात असून कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे सांगून सीतारामन पुढे म्हणाल्या की, ८.६९ कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. या शेतकऱ्यांच्या जनधन योजनेद्वारे काढण्यात आलेल्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा होईल. कोरोना आजाराविरुद्ध आरोग्य क्षेत्रातील जे लोक लढत आहेत, त्यांचा ५० लाख रुपयांचा विमा काढला जाणार असून तीन महिन्यासाठी विम्याचे हे कवच उपलब्ध करून दिले जाईल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनांकरिता १ लाख ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

कामगार आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, याकरिता त्यांच्या पीएफ खात्यातून तीन महिन्याच्या पगाराइतकी किंवा ७५ टक्के यातील जी कमी रक्कम असेल, ती काढण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे सांगून सीतारामन पुढे म्हणाल्या की, ज्या कंपन्यामधील ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन १५ हजार रुपयांच्या खाली आहे, अशा कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा पीएफचा हिस्सा (१२ टक्के) तसेच कंपनीच्या वाट्याचा हिस्सा (१२ टक्के) असा २४ टक्के हिस्सा पुढील तीन महिन्यासाठी केंद्र सरकार अदा करेल. 

२० ते ६३ लाख महिला स्वयंसहाय्यता गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत दुपटीने वाढ केली जात असल्याची घोषणाही सीतारामन यांनी केली. उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना घरगुती गॅसची जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यांना पुढील तीन महिन्यासाठी मोफ़त गॅस दिला जाईल. ८.३ कोटी बीपीएल कुटुंबाना याचा फायदा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

जनधन योजनेअंतर्गत बँकखाती उघडलेल्या महिलाना पुढील तीन महिन्यासाठी दरमहा ५०० रुपयांची मदत केली जाणार असून थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगून अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, मनरेगा योजनेअंतर्गत जे लोक काम करीत आहेत, त्यांच्या दैनिक वेतनात १८२ रुपयांवरून वाढ करून ती २०२ रुपये इतकी करण्यात आली आहे. ५ कोटी कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे. तीन कोटी वरिष्ठ नागरिक, गरीब विधवा आणि गरीब दिव्यांगाना एक हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

वैद्यकीय तपासणी आणि स्क्रीनिंग तसेच आरोग्यविषयक अन्य योजनांसाठी राज्य सरकारांना जिल्हा खनिज निधीतील पैसा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, बांधकाम क्षेत्रातील ३.५ कोटी कामगारांनाही दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ३१ हजार कोटी रुपयांचा निधी यादृष्टीने वापरण्यास राज्य सरकारांना परवानगी देण्यात आली आहे.