Tue, May 26, 2020 14:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेररे उड्डाणपूल बंद; फॉकलंड उड्डाणपुलाची कोंडी

फेररे उड्डाणपूल बंद; फॉकलंड उड्डाणपुलाची कोंडी

Last Updated: Feb 18 2020 2:05AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

चर्नीरोड आणि ग्रँटरोड दरम्यान असलेला फेररे उड्डाणपूल धोकादायक ठरवत गेल्या महिन्याभरापासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाअभावी वाहन चालकांना केनेडी उड्डाणपूल आणि फॉकलंड उड्डाणपुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा लागत आहे. मात्र केनेडी उड्डाणपुलाहून अधिक भार फॉकलंड उड्डाणपुलावर पडत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

फेररे उड्डाणपूल बंद झाल्याने मौलाना शौकत अली मार्गावरून येणारी वाहतूक आता केनेडी उड्डाणपूल आणि फॉकलंड उड्डाणपुलाचा वापर करत आहे. त्यात नाना चौकाकडे जाणारे वाहन चालक केनेडी उड्डाणपुलावरून जाणे पसंत करतात. मात्र उड्डाणपुलावर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, याउलट सायंकाळी पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, अशी माहिती टॅक्सी चालक महेश बांगर यांनी दिली. बांगर यांनी सांगितले की, चर्नीरोड पूर्वेकडून पश्चिमकडील नाना चौकाकडे जाणार्या वाहनांची संख्या सकाळी व सायंकाळी अधिक असते. त्यात लॅमिग्टन नाना चौकाकडे जाण्यासाठी फेररे उड्डाणपूल हा शॉर्ट कट होता. मात्र तो बंद झाल्याने गाड्यांना वळसा घालून केनेडी उड्डाणपुलामार्गे यावे लागते. दरम्यान, चर्नीरोड रेल्वे स्थानकाच्या मार्गे येणार्‍या वाहनांच्या मार्गात लॅमिंग्टनमार्गे येणार्‍या वाहनांची भर पडते. परिणामी, पूर्वी 5 ते 10 मिनिटांत नाना चौक गाठणार्‍या वाहनांना आता 25 ते 30 मिनिटे खर्च करावी लागतात.

फेररे उड्डाणपूल बंद झाल्याचा अधिक फटका फॉकलंड उड्डाणपुलाला बसला आहे. ताडदेव सर्कलमार्गे लॅमिंग्टन रोडला जाण्यासाठी फेररे उड्डाणपूल व फॉकलंड उड्डाणपूल असे दोन सर्वाधिक सोयीचे मार्ग होते. मात्र त्यातील फेररे उड्डाणपूल बंद झाल्याने फॉकलंड उड्डाणपुलावर अधिक ताण पडला आहे. फॉकलंड उड्डाणपुलावरून नवजीवन सोसायटीला पोहचताना सकाळ व दुपारच्या वेळी अधिक वाहतूक कोंडी होते. मात्र पुलाच्या पूर्वेकडील नवजीवन सोसायटी सिग्नलजवळ उभे असलेले वाहतूक पोलीस कोंडी टाळण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, वाहतूक पोलिसांच्या तोंडाला येथील कोंडी फोडण्यासाठी फेस येत असल्याचे दररोज पाहायला मिळते, अशी प्रतिक्रिया स्थानिक दुकानदार रमणिकलाल छेडा यांनी दिली.

उड्डाणपूल मुहूर्ताचा पत्ता नाही

धोकादायक ठरलेल्या फेररे उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना 16 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंदी लादण्यात आली. त्यानंतर 16 व 17 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुलावरील विविध आस्थापना आणि यंत्रणांना केबल व पाईप काढण्यासाठी 14 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली. पश्चिम रेल्वेनेही मोठा ब्लॉक घेत पुलाचा गर्डर काढण्याचे काम केले. मात्र त्यानंतर पूल पाडून दुसरा पूल उभारण्याबाबत वेगवान हालचाली पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे नवा पूल कधी उभा राहणार? आणि तो सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार? असे अनेक प्रश्न स्थानिकांसह वाहन चालकांमधून उपस्थित केले जात आहेत.