Sat, Sep 19, 2020 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीच्या पाच हजारावर जागा वाढणार

अकरावीच्या पाच हजारावर जागा वाढणार

Last Updated: Jul 15 2020 1:46AM
मुंबई : पवन होन्याळकर

यंदा अकरावीची 35 महाविद्यालये नवी सुरू होत आहेत. या नव्या महाविद्यालयामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या जागांमध्ये पाच हजारहून अधिक जागांची भर पडणार आहे. गतवर्षी अकरावी ऑनलाइनसाठी 817 महाविद्यालये होती. यंदा हा आकडा 850हून अधिक पोहचला आहे.

प्रवेशाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कनिष्ठ महाविद्यालयांचीनोंदणी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणीच्या पहिल्या भागाला सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका तसेच पनवेल विभागातील यंदा नव्याने 35 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमध्ये 50हून अधिक तुकड्या सुरू होणार आहेत. या तुकड्यांमुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबईमध्ये तब्बल पाच हजारहून अधिक जागा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी मुंबई विभागात ऑनलाइनसाठी तब्बल 3 लाख 26 हजार 796 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 2 लाख 18 हजार 725 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर एकूण जागापैकी 1 लाख 8 हजार 71 इतक्या जागा रिकामी राहिल्या होत्या. असे असतानाही यंदा पूर्वी मान्यता मिळालेल्या व गतवर्षी समावेश न झालेल्या अशा 35 महाविद्यालयांचा नव्याने समावेश झाला आहे.

नव्याने नोंदणी केल्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशाच्या जागा वाढ होत आहे, अशी माहिती मुंबई अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी सांगितले. गतवर्षी 817 कनिष्ठ महाविद्यालये होती. नव्याने महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. महाविद्यालयांची अपलोड प्रक्रिया सुरु असून अकरावी प्रवेशाच्या नेमक्या किती जागा वाढतील, हे आताच सांगता येणार नाही. 5 हजारहून अधिक जागा वाढतील. पण नेमक्या जागा या महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाल्यावर एकूण आकडेवारी स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.

वाढणार्‍या जागांचे भय दरवर्षी अकरावी प्रवेशात मोठ्या प्रमाणात जागांची वाढ होते. मात्र त्या पेक्षा रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाढत आहे. दोन वर्षापूर्वी 70 हजार जागा रिक्त होत्या. तर गतवर्षी हाच आकडा 1 लाखावर पोहचला आहे. यंदाही नवी महाविद्यालये वाढली आहेत. त्यामुळे आणखी जागांची भर पडली आहे. त्यामुळे रिकाम्या जागांचा फुगवटा कसा कमी करणार हाच प्रश्न आहे. न्यायालयाने नव्याने महाविद्यालयाना मान्यता देण्यास बंदी घातली असली तरी अंतिम निर्णयाची प्रतिक्षा आहे.

 "