Thu, Aug 06, 2020 03:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी प्रवेश : आजपासून सराव अर्ज

अकरावी प्रवेश : आजपासून सराव अर्ज

Last Updated: Jul 16 2020 1:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अकरावी प्रवेश अर्जातील विद्यार्थ्यांच्या चुका कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सरावासाठी गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध केला आहे. ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत सराव करता येणार आहे, तर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार आहे.

येणार्‍या 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या महापालिका क्षेत्रात ही प्रवेश प्रक्रिया आहे. पहिल्या टप्प्यात महाविद्यालयांची जागा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सरावाची संधी दिली जाणार आहे. प्रवेशाच्या https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर Mock.Demo.Registration या नावाने लिंक असणार आहे. ही लिंक ओपन करून विद्यार्थ्यांना सराव अर्ज भरता येणार आहे.

सरावाचा अर्ज कायमचा नाही

मूळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी आठ दिवसांच्या कालावधीसाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी प्रारूप लॉगीन सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात होण्यापूर्वी भरलेली माहिती नष्ट करून मूळ संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपासून असणार आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी, पालकांनी घ्यावी.

मुख्याध्यापकांचीही जबाबदारी वाढली

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील माहिती ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावी तसेच विद्यार्थी / पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गतवर्षीचेच लॉगीन आय.डी. व पासवर्ड वापरावेत. शाळास्तरावरून अर्ज अप्रूव्ह करण्याची कार्यवाहीसुद्धा ऑनलाईनच करावयाची आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता थेट कार्यवाही करण्याचेही आदेश शिक्षण प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत.

असे असणार प्रवेशाचे टप्पे

1. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग-1 भरणे व प्रवेश अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा / मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला आहे याची खात्री करणे. ही प्रक्रिया 26 जुलै, 2020 पासून सुरू होईल. चाचपणी विद्यार्थ्यांनी स्वतः व पालक/ शाळांच्या मदतीने करण्याची आहे.
2. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग -1 ऑनलाईन तपासून व्हेरीफाय करणे. आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाणार आहे. ही प्रक्रिया 27 जुलै, 2020 पासून संबंधित शाळा / मार्गदर्शन केंद्र करतील.
3. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे त्याचबरोबर नवीन अर्ज भाग-1 सुद्धा भरता येणार आहे. ही प्रक्रिया दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया विद्यार्थी स्वतः, पालक/ शाळांच्या मदतीने करावयाची आहे.