Wed, May 12, 2021 01:21
डबल म्युटंटचा महाराष्ट्राला तडाखा!

Last Updated: May 04 2021 2:45AM

मुंबई : अजय गोरड

अमेरिका आणि ब्रिटनच्या डबल म्युटंट कोरोनाचा महाराष्ट्राला एप्रिलमध्ये जबर तडाख बसला आणि या महिन्यात तब्बल 18 लाख लोकांना संसर्ग झाला. तर 14 हजार बळी गेले. महाराष्ट्रात जो डबल म्युटेंट आढळून आला आहे तो अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि ब्रिटनमधील असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे.  महाराष्ट्रात हा डबल म्युटेंट विषाणू गेल्यावर्षीच्या विषाणूच्या तुलनेत 6 ते 7 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचे आकडेवारी सांगते.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अमेरिका, ब्रिटनसह युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली होती. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत देश-विदेशातून येणारे लोक तेव्हापासूनच हळूहळू संसर्ग पसरवत होते, हे आता पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) ने केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमधून स्पष्ट झाले आहे.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात दररोज सरासरी 3 हजार नवे रुग्ण आढळत होते. फेब्रुवारीत हेच प्रमाण सरासरी 4 हजारांवर गेले. मात्र मार्च महिन्यात रोज सरासरी 20 हजार नवे रुग्ण आढळले आणि महिन्याची रुग्णसंख्या  6 लाख 60 हजारांवर पोहोचली. एप्रिलमध्ये रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण आढळले. या महिन्यात 17 लाख 89 हजार 864 नवे रुग्ण आढळून आले.