Thu, Aug 13, 2020 17:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनी पुढे यावे'

'प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनी पुढे यावे'

Last Updated: Jul 08 2020 1:37PM
पालघर : पुढारी वृत्तसेवा

प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोरोनाचा रुग्ण पूर्ण पणे बरा होऊ शकतो, या थेरपी सेंटरला पालघर जिल्ह्यात परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश मिळाले असून प्लाझ्मा थेरेपीचा वापर करणाऱ्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्याचा समावेश झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 

नालासोपारा येथील साथिया ट्रस्ट प्लाझ्मा पेढीचे अध्यक्ष विजय महाजन यांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांची भेट घेऊन साथिया ट्रस्ट रक्त पेढीला प्लाझ्मा अँफेरेसीसची परवानगी मिळाली असल्याबाबतची माहिती दिली. 

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रयत्नामुळे पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील प्लाझ्मा थेरेपीचा वापर करणाऱ्या मोजक्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा ठरणार आहे. आता पालघर जिल्ह्यामध्ये कोविड-१९ च्या रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी देणे शक्य होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कोविड-१९ बाधित रुग्ण जे पूर्णतः बरे झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येऊन कोविड-१९ च्या रुग्णांना जीवदान देऊन कोरोना रुग्णाला वाचवण्याचे मोठे काम यातून घडू शकते, असा विश्वास व्यक्त करून यासाठी विजय महाजन यांना संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.