Sun, Aug 09, 2020 02:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंदीचा फेरा : यावर्षी 16 लाख नोकर्‍या घटणार

मंदीचा फेरा : यावर्षी 16 लाख नोकर्‍या घटणार

Last Updated: Jan 15 2020 1:03AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मंदीच्या वातावरणाचा मोठा फटका नवीन वर्षात बसण्याची शक्यता आहे. यावर्षात अपेक्षेपेक्षा 16 लाख नोकर्‍यांची घट होईल, असा अंदाज एका संस्थेच्या पाहणी अहवालात व्यक्‍त करण्यात आला आहे. गतवर्षी 89.7 नव्या नोकर्‍यांची निर्मिती झाली होती. आसाम, राजस्थान सारख्या राज्यांना याची झळ तीव्रतेने जाणवेल. या राज्यांमध्ये असलेल्या हंगामी नोकर्‍या बर्‍यापैकी संपुष्टात येतील असे अहवाल म्हणतो.

गतवर्षी 89.7 नव्या नोकर्‍यांची नोंद कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार झाली होती. यावर्षीच्या अपेक्षेनुसार त्यात किमान 15.8 लाख नोकर्‍या घटतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरमहा किमान 15 हजार रुपये पगार घेणार्‍या कर्मचार्‍याची नोंद भविष्य निर्वाह निधीकडे केले जाते. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान 43.1 लाख कर्मचार्‍यांची नोंद करण्यात आली होती. आगामी आर्थिक वर्षा अखेरीस 73.9 लाख कर्मचार्‍यांची नोंद होऊ शकते असे या अहवालात म्हटले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीत सरकारी कर्मचार्‍यांची नोंद नाही. राष्ट्रीय पेन्शन योजनेकडे असलेल्या आकडेवारीनुसार राज्य आणि केंद्र सरकारकडून नव्या 39 हजार नोकर्‍यांची भर पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

आसाम आणि राजस्थान बरोबर बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही नोकर्‍यांची कमतरता जाणवणार आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होईल अशी शक्यता आहे. तसेच शेती आणि औद्योगिकरीत्या पिछाडीवर पडलेल्या राज्यांमधूनही स्थलांतर होवू शकते. पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांकडे बेरोजगारांचे मोठे लोंढे येवून थडकतील असेही या अहवालात नमूद आहे. नवी दिल्‍ली, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद या शहरांकडे बेरोजगार तरुण धाव घेतील. गेल्या 5 वर्षांमध्ये उत्पादन वाढीचा दर स्थिर राहिला आहे. त्यात किंचित वाढ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर झाला आहे.