Wed, May 27, 2020 03:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ जन्मस्थळी भव्य तीर्थस्थळ व पर्यटनसृष्टी व्हावी

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ जन्मस्थळी भव्य तीर्थस्थळ व पर्यटनसृष्टी व्हावी

Last Updated: Feb 18 2020 2:05AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रातील उमरठ या भूमीत नरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म झाला.तानाजी मालुसरे व इतर शूरवीरांची माहिती होऊन त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर निर्माण व्हावा यासाठी उमरठ या गावी भव्य पर्यटनसृष्टी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केली. यासाठी 100 कोटींचा विकास निधी उमरठसाठी द्यावा, अशी मागणी राज्य विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नरवीर तानाजी मालुसरे यांचा त्रिशतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी शौर्य दिन सोहळा व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्ह्यातील मु. उमरठ, पोस्ट साखर, तालुका पोलादपूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी उमरठमधील उत्सवाचे पदाधिकारी तसेच उमरठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी प्रवीण दरेकर म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शूरवीरासाठी ‘गड आला, पण माझा सिंह गेला’ असे गौरवोद्गार काढले त्यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. घरातील शुभकार्य मागे ठेवून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ या भावनेतून राजाप्रति निष्ठा आणि त्यागाची भावना असणारा शिलेदार म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे! विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून समाजात वावरत असताना तानाजी मालुसरेंचे नाव घेतल्याशिवाय आमची वाटचाल पूर्ण होत नाही, अशी कृतज्ञ भावना प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

ज्या पोलादपूरच्या भूमीत तानाजी मालुसरेंसारख्या महान योद्ध्याचा जन्म झाला त्या पोलादपूर तालुक्याचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान वाटतो, असे सांगून प्रवीण दरेकर म्हणाले, छत्रपतींचे नाव घेऊन आम्ही सरकारमध्ये मानसन्मानाने बसतो. तानाजी मालुसरेंचे नाव घेऊन आम्ही कारभार सांभाळतो.या तानाजी मालुसरेंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीचा विकास होणे आवश्यक आहे. हा विकास करण्यासाठी 100 कोटींचा विकास निधी उमरठसाठी द्यावा, अशी मागणी राज्य शासनाकडे येत्या अधिवेशनात पूर्ण ताकदीने करणार आहोत.

तानाजी मालुसरेसारख्या युगप्रवर्तक आणि कर्तृत्ववान पुरुषाच्या पावन स्मृतीस अभिवादन करायला मिळणे हे भाग्य समजतो.भविष्यात या विभागाचा विकास व्हावा. या माध्यमातून संपूर्ण इतिहासाचे चित्र समाजासमोर उभे राहील.ज्याप्रमाणे चित्रपटाच्या माध्यमातून तानाजी जगासमोर आले. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यास लक्ष घालणार असून यासाठी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आराखडा तयार करावा, असे आवाहनही प्रवीण दरेकर यांनी केले.