Wed, May 12, 2021 00:53
राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट

Last Updated: May 05 2021 2:01AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, नंदुरबार, नांदेड, धुळे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, भंडारा, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदिया या 15 जिल्ह्यांत मागील तीन आठवड्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांसह राज्यातील 20 जिल्ह्यांतील रुग्णवाढ कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात संचारबंदी व कडक निर्बंधांनंतर रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 27 टक्क्यांवरून 22 टक्के खाली आला आहे. राज्यात सध्या दररोज अडीच ते पावणे तीन लाख चाचण्या केल्या जात आहेत. यात 65 टक्के आरटी-पीसीआर तर 35 टक्के अँटिजेन चाचण्या करत आहोत. रुग्ण बरा होण्याचा दर वाढला आहे. मागील तीन आठवड्यांत सरासरी 49 हजार नवीन रुग्ण वाढले तर सरासरी 59 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे दररोज सरासरी 10 हजार रुग्ण अधिकचे बरे होत असल्याने आरोग्य यंत्रणावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के इतके आहेत, तर देशाचे हेच प्रमाण 81 टक्के इतके आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजन बचतीसाठी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच 50 रुग्णांमागे एक ‘ऑक्सिजन सिस्टर’ नेमण्यास सांगितले आहे. सोबतच आवश्यक ऑक्सिजन मिळावा म्हणून केंद्र सरकारशी सातत्याने बोलत आहोत. सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज 40 हजाराच्या आसपास रेमडेसिवीर मिळत आहेत. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसिवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकार्‍यांना वाटप केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राला केंद्र शासनाकडून 10 पीएसए प्लांट मंजूर झाले होते, त्यातील 9 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्गमधील प्लांट लवकरच कार्यरत होईल. सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांमार्फत 150 ऑक्सिजन पीएसए प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुनर्वसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे टोपेंनी सांगितले.

जागतिक निविदेला जगभरातील कंपन्यांचा प्रतिसाद

40 हजार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर,27 ऑक्सिजन साठवणूक करणारे टँक, 25 हजार मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन, 10 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन आणि 132 पीएसए ऑक्सिजन प्लांट आदी वस्तू, साहित्यांसाठी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जागतिक निविदेला विविध देशांतील कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. इस्रायल, ब्रिटन, फ्रान्स, अमेरिकेसह अनेक देशांतील कंपन्यांनी निविदेत सहभाग नोंदवला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिवीर,20 हजार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिजनचा बफर स्टॉकसाठी 27 स्टोरेज टँक उपलब्ध होतील. पीएसए प्लांटबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. पुढील काही दिवसांत सर्व वस्तू, साहित्यांच्या खरेदीची ऑर्डर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती देईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.