दोन्ही लसींचा पर्याय आता एकाच केंद्रावर

Last Updated: Feb 28 2021 2:11AM
Responsive image
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोव्हॅक्सिन-कोव्हीशिल्ड लस एकाच केंद्रावर मिळण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. ज्या ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध तेथे कोव्हीशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थींना इच्छित लस घेण्यातील अडचणी दूर होणार आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या निमित्ताने लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जे.जे. रुग्णालयात याची सुरुवात देखील झाली आहे.

राज्यात सध्या 650 पेक्षा अधिक केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत 10,28,271 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. मात्र यातील को व्हॅक्सीनचे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय कोव्हॅक्सीनचे उपलब्ध केंद्र कोव्हीशिल्डच्या तुलनेत कमी असल्याने कोव्हॅक्सीनचे लसीकरण धीम्या गतीने सुरू आहे.
लसीकरण सुरू असलेल्या प्रत्येक केंद्रावर दोन्ही लस देता येतील अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. यासाठी लसीकरण होत असलेल्या प्रत्येक केंद्रावर दोन्ही लसींचे व्यवस्था करण्यात येत आहे. 

याबाबतचे आवश्यक निर्देश देण्यात आले असून लवकरच एकाच केंद्रावर दोन्ही लसी उपलब्ध होणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. यामुळे लाभार्थींच्या अडचणी दूर होणार असून त्यांना आपल्याच केंद्रावर नोंदणी केलेली लस घेता येणार आहे.

कोव्हॅक्सिन लसीला कमी प्रतिसाद

कोणती लस घ्यायची हे लाभार्थींच्या इच्छेवर अवलंबून नसते. लाभार्थींची नोंदणी ज्या लसीसाठी झाली असेल तीच लस लाभार्थींना त्या केंद्रावर घेता येणार असल्याचे ही डॉ. पाटील यांनी सांगितले. लाभार्थींनी कोणती लस घ्यायची हे भारत सरकारने ठरवलेल्या नियोजनानुसार होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्या ठिकाणी कोव्हॅक्सिन  उपलब्ध आहे, त्या केंद्रावर लवकरच कोव्हीशिल्ड लसीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. जे.जे. रुग्णालयात याची सुरुवात देखील झाली आहे.