Sun, Sep 20, 2020 05:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आंदोलन पेटणार

मराठा आंदोलन पेटणार

Last Updated: Sep 17 2020 1:55AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाला धक्का बसला असून मराठा संघटना आता आंदोलनाच्या पावित्र्यात आल्या आहेत. त्यातच मराठा आरक्षण बहाल झाले नसताना बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांच्या साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यभर आंदोलनाला
सुरुवात केली जाणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. मुंबईत राज्यस्तरीय बैठक झाल्यानंतर जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे. त्यानुसार येत्या तीन-तीन दिवसात ही आंदोलने सुरू केली जाणार आहेत. कोरोनाची परिस्थिती आणि राज्यात गेले काही महिने बंदचे वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी बंद ऐवजी रास्ता रोको आणि निदर्शने केली जाणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील बैठकीत जोपर्यंत आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठत नाही तोपर्यंत राज्य सरकारी नोकर भरती करू नये अशी मागणी करण्यात आली होती. मात्र बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस शिपायांची साडेबारा हजार पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या जखमेवर मीठच चोळले गेले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये नाराजी असून राज्य सरकारने आंदोलनासाठी आगीत तेल ओतल्याची भावना व्यक्त होत आहे. 

 "