Tue, Oct 20, 2020 11:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजाच्या सवलतींवर येत्या दोन दिवसांत निर्णय

मराठा समाजाच्या सवलतींवर येत्या दोन दिवसांत निर्णय

Last Updated: Sep 22 2020 1:12AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाच्या नोकर्‍या आणि शिक्षणातील सवलती आणि ‘सारथी’बाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील, असे मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यासंबंधी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या अंतरिम स्थगितीमुळे राज्यात मराठा आंदोलन तीव्र होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब आदी उपस्थित होते.

सरकारचे प्रामाणिक प्रयत्न

मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सर्वपक्षीय बैठक, मराठा संघटना आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सरन्यायाधीश निर्णय घेतील. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे देण्यात आलेल्या सवलतींवर कोणता परिणाम झाला आहे. त्यावर विविध विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देणार आहेत, असे सांगत चव्हाण यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले. दरम्यान, ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात आक्रमक होत असलेल्या मराठा आंदोलनाचा आढावा घेतला. 

शरद पवारांशीही चर्चा

अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली, असे चव्हाण यांनी या भेटीबाबत सांगितले.

आरक्षण कुणाला नको? त्यांची नावे जाहीर करा : चव्हाण

बडे मराठा नेतेच आरक्षणविरोधी आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांना प्रत्युत्तर देताना चव्हाण यांनी, चंद्रकांत पाटील यांना ‘त्या’ नेत्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान दिले. रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे. रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळ निर्माण केला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षणाला मंत्र्यांचाच विरोध; विनायक मेटेंचा आरोप

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा घास हिरावला. राज्यातील सात ते आठ मंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. योग्य वेळ आल्यावर संबंधित मंत्र्यांची नावे जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. मराठा आरक्षणप्रश्‍नी उद्धव ठाकरे कोणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित करून मेटे म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाविरोधात आहेत.

 "