Fri, May 07, 2021 19:04
विरार आग दुर्घटना : 'आमचे बाबा गेले, माझा भाऊ गेला'; नातेवाईकांची आर्त हाक 

Last Updated: Apr 23 2021 1:37PM

विरार (जि. पालघर) : रिंकी खाडे

नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सीजन गळती होऊन २४ रुग्ण दगावल्याची घटना ताजी असतानाच आज शुक्रवारी विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाला आग लागून १४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटे सव्वातीन वाजता एसीचा स्फोट होऊन ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन तब्बल दोन तासांनतर ही आग आटोक्यात आणली. पण दुर्घटनेत १४ कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागला.

वाचा : एसीचा स्फोट झाल्याने विरारमधील रुग्णालयात आग, १३ जणांचा होरपळून मृत्यू

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विरारमधील रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी असून हृदय पिटाळून टाकणारी असल्याचे म्हटले आहे. 

या घटनेनंतर रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. 'आमचे बाबा गेले, माझा भाऊ गेला' अशी सैरभैर झालेल्या नातेवाईकांची आर्त हाक ऐकू येत होती.

वाचा : विरारमध्ये दोन तास अग्नितांडव, आयसीयूमधील १७ पैकी १३ रुग्ण होरपळले! नेमकं काय घडलं?

'ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आयसीयूमध्ये एकच नर्स होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी रुग्णालयातील कोणाकडे नंबर नव्हता. हे दुर्दैव. रुग्णालय प्रशासनाने अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी उशीर केला,' असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

आगीच्या घटनेनंतर नॉन कोव्हिड रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं. ऑक्सिजन सिलिंडर सोबतच रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. 

या घटनेमुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नाशिक नंतर विरार येथे घडलेली घटना काही नवीन नाही. याआधी भंडारा जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

वाचा : देशात आणीबाणीसद़ृश स्थिती

दरम्यान, विरारमधील घटनेनंतर मंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, भाजप नेते किरीट सोम्मया यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.