Mon, Jul 13, 2020 01:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चक्रीवादळ उद्या हरिहरेश्‍वरला : मुंबई, ठाणे, पालघरला रेड अ‍ॅलर्ट

चक्रीवादळ उद्या हरिहरेश्‍वरला : मुंबई, ठाणे, पालघरला रेड अ‍ॅलर्ट

Last Updated: Jun 02 2020 1:43AM
मुंबई : पुढारी डेस्क

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निघाले असून, 3 जून रोजी ते कोणत्याही क्षणी धडकेल. सुमारे 100 किलोमीटर प्रतितास वेगाने हे वादळ निघाले असून,  मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीवरील शहरांना हवामान खात्याने रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे. 

राज्याची किनारपट्टी प्रामुख्याने पालघर परिसरात अतिवृष्टीची शक्यता असून उत्तर मध्य महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाने 3 व 4 जून रोजी 204 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.    

रविवारी 3 जूनसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट करण्यात आला होता. मात्र वादळाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी हे चक्रीवादळ मुंबईपासून दक्षिण-पश्‍चिमला 630 किलोमीटरवर होते. सुरतपासून दक्षिण-पश्‍चिमेला 850 किलोमीटरवर होते. पुढील 123 तासांत हे चक्रीवादळ अरबी समुद्रात पूर्व मध्य भागात अधिक तीव्र होऊ शकते. मंगळवारी हे चक्रीवादळ कोकण ( हरिहरेश्‍वर, रायगड), दक्षिण गुजरात, मुंबई पार करून पुढे उत्तर मध्य महाराष्ट्रात धडकणार आहे. चक्रीवादळाच्या मार्गात हरिहरेश्‍वर असल्याने या वादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्यालाच बसू शकतो. 

याआधी 1891 मध्ये अरबी समुद्रात वादळ उठले होते. त्यानंतर दोनवेळा वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली, मात्र कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्याने वादळही हवेतच विरले. मात्र तब्बल 129 वर्षांनंतर पुन्हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका घोंगावत आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर येथील मच्छीमारांना बोटी किनार्‍यावर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच किनारपट्टीवरील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुंबईत बुधवारी व गुरूवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर कोकणात 4 जूनला काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी पडण्याची शक्यता आहे.

मुंबईची यंद्वणा सतर्क

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या काळात मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

चक्रीवादळ 3 जून रोजी पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता असून, या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेता पालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे.

मुंबईकरांनो सावध

मुंबईतील पालिकेच्या 24 विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागातील संभाव्य धोका पोहोचू शकणार्‍या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करून तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमारांनी  समुद्रात जाऊ नये, समुद्रकिनार्यापासून लांब रहावे, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये, अशी विनंती करण्यात येत आहे. मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करावेत. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी जनरेटर कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकाने केले आहे.