मुंबई : पुढारी वृत्तसेवा
तीन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मरण पावलेल्या वांद्रे पोलीस ठाण्याच्या हवालदाराच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी अंधेरीतील सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे ते राहत त्यांच्या वरळीतील निवासी इमारतीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील मुळचे रहिवासी असलेले पोलीस हवालदार सध्या वरळीतील सरपोचखानावाला रोडच्या वरळी पोलीस वसाहतीच्या इमारत क्रमांक 40 मध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबत राहायचे. मे महिन्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट 18 मेला पोलिसांना प्राप्त झाला, त्यात ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना तातडीने वरळीतील एनएसी ग्राऊंड येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. 28 मेला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना कोविड सेंटरमधून घरी पाठवण्यात आले होते. रात्री आठ वाजता घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. आता त्यांच्या दोन्ही मुलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्यामुळे या दोन्ही मुलांना अंधेरी येथील सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.