मुंबईच्या चाळीत, झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव

Last Updated: Mar 27 2020 1:28AM
Responsive image


मुंबई : पुढारी डेस्क

कोरोना विषाणूचा संसर्ग आता मुंबईच्या झोपडपट्ट्यांत आणि चाळींपर्यंत पोहोचला असून, या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी आतापर्यंत 4 रुग्ण आढळल्याने ही मुंबईसाठी धोक्याची घंटा समजली जाते. चाळी आणि झोपडपट्ट्यांतील प्रचंड लोकसंख्या आणि अरुंद जागा पाहता त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग केवळ अशक्य असल्याने मुंबईसमोर हे फार मोठे आव्हान असेल. 

परळ येथील चाळीत राहणारी 65 वर्षीय महिला, कलिनाजवळील जांभळीपाडा झोपडपट्टीतील 37 वर्षीय युवक, घाटकोपरच्या झोपडपट्टीतील 25 वर्षाचा तरुण आणि त्याच झोपडपट्टीतील 68 वर्षांची महिला या चौघांचा कोरोना विषाणूचा संसर्ग अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेला आठवडाभर हे चार जण ज्यांच्या संपर्कात आले. तसेच ज्या-ज्या ठिकाणी त्यांंचा वावर झाला, तेथे किती जणांना प्रादुर्भाव झाला असेल हे सांगणे तूर्तास कठीण आहे. या चौघांच्या सहवासात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे.

1 परळच्या तळमजल्यासह दोन माळ्याच्या चाळीत राहणारी कोरोनाबाधित 65 वर्षीय महिला दोन खानावळी चालवते. प्रभादेवीत अनेक कॉर्पोरेट कार्यालयांना  जेवणाचे डबेही पुरवते. आता कोरोनाची लागण झाल्यापासून तिच्या खानावळीत कोण कोण जेवून गेले, तिने किती जणांना डबे दिले याचा शोध घेतला जात आहे. या महिलेला कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपनीच्या विदेशी प्रवास करून आलेल्या कर्मचार्‍याकडूनच संसर्ग झाला असू शकतो. बुधवारी तिच्या दोन्ही खानावळी बंद करण्यात आल्या. संपूर्ण चाळीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जे जे लोक या महिलेस ओळखतात किंवा तिच्या सहवासात आले त्या सर्वांना आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महिलेच्या घरातील सदस्यांचीही तपासणी करण्यात आल्याचे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (जी /साऊथ) शरद उघाडे यांनी दिली आहे.

2 कलिनानजीकच्या जांभळीपाडा झोपडपट्टीत राहणारे 37 वर्षीय गृहस्थ इटलीहून मुंबईत परतले. सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण असलेल्या इटलीत ते वेटर म्हणून काम करात. ते इटलीहूनच कोरोनाची बाधा घेऊन आले आहेत. ते राहतात त्या परिसरात सुमारे 800 झोपडीधारक असून जेमतेम 100 सिट शौचालयांची सोय आहे. इटलीहून आले तेव्हा विमानतळाच्या तपासणीत कोणतीही लक्षणे त्यांच्यात आढळली नाहीत. काही दिवसांनी अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पाठवले मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि सोमवारी कस्तुरबात पुन्हा तपासणी केली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. इटलीहून आल्यापासून हे गृहस्थ मुंबईत सर्वत्र वावरले. त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा अहवाल अद्याप यायचा आहे. प्रकृती बरी नसल्याने या गृहस्थांनी ज्या डॉक्टरकडे धाव घेतली होती तो दवाखाना सिलबंद करण्यात आला असून डॉक्टर आणि त्यांच्या 5 सहकार्‍यांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

3 मध्य उपनगरात घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहणारी 68 वर्षीय गृहिणीची काही दिवसांपूर्वी केलेली चाचणी निगेटिव्ह होती. कस्तुरबात उपचारही करण्यात आले. मात्र पुन्हा तपासणी केली असता चाचणी पॉझिटीव्ह आली. या महिलेच्या घरातील 9 सदस्य आणि संपर्कात आलेल्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. 

4 घाटकोपरच्याच या झोपडपट्टीत राहणार्‍या 25 वर्षीय युवकाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक बाधित महिलेच्या घराजवळ असलेल्या टपरीवर नेहमी चहा घेत होता. या चहावाल्यातही कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. हा परिसर आम्ही दररोज निर्जंतुक करत असल्याचे पालिका अधिकार्‍याने सांगितले.घाटकोपरच्या झोपडपट्टीत जेमतेम एक चौरस किलोमिटर क्षेत्रफळात सुमारे 23 हजार लोक अत्यंत दाटीवाटीने राहतात. बाधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात होता, त्यांचा शोध आरोग्य विभागातील कर्मचारी घेत आहेत. यासाठी आठवडा किंवा महिनाही लागू शकतो.