Tue, Jun 02, 2020 03:57
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 106 वर!

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 106 वर!

Last Updated: Apr 07 2020 1:07AM
ठाणे/वसई विरार : पुढारी वृत्तसेवा

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्हा हा कोरोना संसर्गाचा केंद्र बनू लागला आहे. सोमवारी 9 नवीन कोरोनग्रस्त रुग्ण समोर आल्याने ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 106 वर पोहचली आहे. सहा नवे रुग्ण सापडल्याने सर्वाधिक 33 रुग्ण कल्याण-डोंबिवलीत झाले असून शहरातील संख्या 22 वर पोहचली आहे. दोन नव्या रुग्णांमुळे मीरा-भाईंदरचे 17 रुग्ण झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अंबरनाथमध्ये असलेल्या एकमेव रुग्णाचेही निधन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धोकादायक बाब म्हणजे ठाणे जिल्ह्यात आणखी 427 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे सापडली असल्याने प्रशासनाने  कडक भूमिका घेत पाचही शहरांच्या सीमा आता सील करण्यात आल्या आहेत. वसई-विरार शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सोमवारी शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

वसई-विरार शहरात रविवारपर्यंत एकूण 13 करोनाबाधित रुग्ण होते. सोमवारी त्यात 4 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 21 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 4 आहे.
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून दररोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. भिवंडी, शहापूर तालुके वगळता ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके, शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. कल्याण-डोंबिवलीत सहा नवीन रुग्ण सापडले असून दोन रुग्ण कल्याण आणि चार रुग्ण हे डोंबिवलीतील आहेत. त्यापैकी डोंबिवली पश्चिमधील एक तरुणीही मुंबईतील जसलोक रुग्णालयातील परिचारिका आहे. त्याचवेळी डोंबिवलीतील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण जो लग्नात सामील झाला होता, तो पूर्णपणे बरा झाला आहे. डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्व आणि पश्चिममध्येही कोरोनाने थैमान घातलेला आहे. 

ठाण्यातील घोडबंदररोड परिसरापासून सुरू झालेला कोरोनो आता ठाणे, कळवा आणि आता मुंब्र्यात पोहचला आहे. आज विटाव्यातील एका नव्या रुग्णांची भर पडल्याने  ठाणे महापालिका हद्दीत रुग्णांची संख्या 22 झाली आहे. 100 इमारती असलेल्या वृंदावन सोसायटीमध्ये दुबईहून आलेल्या 67 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट होताच तीन इमारती सील करण्यात आल्या. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. नौपाड्यातील 28 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले असून त्याच डॉक्टरकडून मनीषा नगर येथील कोरोनाग्रस्त व्यक्तीने उपचार घेतले होते, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्या डॉक्टरचा बंगला सील करून डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतले जात आहे.  

ठाण्याप्रमाणे मीरा-भाईंदर शहरात सोमवारी आणखी दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 वर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दोन महिला कोरोनाबाधित रुग्णांना व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्या महिलेच्या पतीसह दोन मुले, दोन सुना व तीन नातवंडे असे एकूण आठ जणांचे स्वॅब नमुने पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पालिकेने आत्तापर्यंत 109 रुग्णांचे स्वॅब नमुने कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले असुन त्यातील 17 रुग्ण कोरोनाबाधित तर 39 रुग्ण निगेटीव्ह व उर्वरीत 53 रुग्णांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

वसई : नालासोपारा येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ओमनगर येथील 65 वर्षीय रुग्णाचा रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. हा रुग्ण मुंबईच्या हॉटेलमध्ये कामाला होता. त्याला किडनीचा त्रास होता म्हणून तो उपचारासाठी नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात दाखल झाला होता. या मृत्यूनंतर वसईत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा दोनवर पोहोचला होता. 

सोमवारी नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण वसईच्या आनंदनगर परिसरातील असून तो पहिल्या ओमनगर येथील मृत पावलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. त्याचे वय 67 वर्षे आहे. तर दुसरा रुग्ण नालासोपारा सेन्ट्रल पार्क परिसरात आढळला असून तो सुद्धा मुंबईच्या तारांकित हॉटेलमधील कर्मचारी असून त्याचे वय 57 वर्षे आहे. तर वसई-पूर्व परिसरात डी मार्टजवळ राहणारी तिसरी एक 38 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली आहे. ती मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये केअरटेकरचे काम करीत होती. तेथेच कोरोनाबाधित रुग्णाच्या सानिध्यात आल्यामुळे तिलाही लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या हा सर्व परिसर महापालिकेतर्फे सील करण्यात आला असून परिसर निर्जंतुक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिली.  

नालासोपारा पेल्हार येथील एका 38 वर्षीय गर्भवती महिलेचा मुंबईचया नायर हॉस्पिटलमध्ये शनिवारी मृत्यू झाला होता. तिच्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल सोमवारी आला असून कोरोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वसई-विरारमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 17, तर मृतांची संख्या आता 3 वर गेली आहे.