होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : राज्यात कोरोना बाधित संख्या 123

मुंबई : राज्यात कोरोना बाधित संख्या 123

Last Updated: Mar 25 2020 11:47PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता 123 झाली आहे. बुधवारी आणखी 15 रुग्ण वाढले. तर बाधितांपैकी 14 जण उपचारानंतर कोरोनामुक्‍त झाले आहेत. ही बाब दिलासा देणारी म्हणावी लागेल.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातून मंगळवारी आठ तर बुधवारी पुण्यात एक दाम्पत्य कोरोना निगेटिव्ह झाल्याने घरी पाठविण्यात आले. याशिवाय आणखी चार जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. घरी सोडल्यानंतरही या सर्वांना काही काळ विलगीकरणात ठेवले जाणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन आणि जनतेची चिंता वाढली असताना  कोरोना बाधित उपचारानंतर बरे होत असल्यामुळे सर्वांनाच काहीसा  दिलासा मिळाला आहे.

बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी 15 जणांची वाढ झाली. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. त्याच कुटुंबातील आणखी 5 सदस्य संसर्गातून बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या कुटुंबातील 9 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी 4 जणांनी सौदी अरेबियाचा प्रवास केला होता. तेथे त्यांना लागण झाली असावी आणि त्यांच्या संपर्कात आल्याने इतर सदस्यांनाही विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हे बाधित कुटुंब अन्य कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे. एकाच कुटुंबातील नऊ जण बाधित झाल्याने इस्लामपूर येथील प्रशासनाला अधिकची सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत दिवसभरात आणखी 9 नवे रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ठाण्यात आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.