Tue, May 26, 2020 16:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत कोरोना रुग्ण चक्क लग्नात नाचला!

डोंबिवलीत कोरोना रुग्ण चक्क लग्नात नाचला!

Last Updated: Mar 29 2020 1:24AM
डोंबिवली : बजरंग वाळुंज

कोरोना विषाणूची लागण झालेल्या डोंबिवलीकर तरुणाने केलेला कहर आता किती जणांना महागात पडणार याची कल्पनाही करणे कठीण होऊन बसले आहे. या तरुणाने हळदी समारंभात हजेरी लावली. किमान 1000 लोकांची उपस्थिती असलेल्या लग्नमंडपातही मिरवला. परिणामी, या दोन्ही कार्यक्रमांत हजर असलेल्यांचा शोध घेत त्यांचे क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण करण्याचे भगीरथ प्रयत्न आता प्रशासनाने चालवले आहेत. 

हा तरुण डोंबिवली पूर्वेस राहतो. तुर्कस्तानमध्ये फिरून आल्यानंतर त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले होते. तरीही तो 18 मार्चला झालेल्या हळदी समारंभ आणि 19 मार्च रोजी जुन्या डोंबिलीच्या ग्राऊंडवर झालेल्या लग्नामध्ये  नाचला. हे सर्व करताना आपण कसे क्वारंटाईनवर आहोत याचे मेसेज तो मित्रांना पाठवत होता. हा तरूण आता कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होताच सारेच हादरले. या लग्नाला हजर राहिलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांना आता पतीसह होम क्वारंटाईन सांगण्यात आले आहे. याशिवाय तरुण राहतो तेथील रहिवाशांची वैद्यकीय तपासणीही सुरू करण्यात आली आहे.