Sat, May 30, 2020 13:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोना रुग्ण 458 वर

मुंबईत कोरोना रुग्ण 458 वर

Last Updated: Apr 06 2020 1:11AM
मुंबई/ठाणे/पालघर : पुढारी वृत्तसेवा

दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून, रविवारी आणखी 113  नवीन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 748 वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक 458 रुग्णसंख्या एकट्या मुंबईची आहे.  ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यात रविवारी 19 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 95 वर पोहोचली. नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 4, ठाणे महापालिका क्षेत्रात 5 तर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात 7, नवी मुंबईत 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यामध्ये तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 

मुंबईत संसर्गाचा फैलाव झपाट्याने वाढतो असून आता झोपडपट्या, चाळींमध्ये शिरकाव केला आहे. रविवारी 5 एप्रिलला पालिकेच्या कस्तुरबा, ट्रामा, राजावाडी, केईएम, वांद्रे - कुर्ला भाभा रुग्णालयात 150 संशयितांना तपासले. त्यापैकी 72 संशयित रुग्णांना भरती करून घेतले. यात 48 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान खासगी लॅबकडे तपासणी दिलेले 55 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या एकाच दिवशी वाढल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 

मुंबईत शनिवारपर्यंत 330 रुग्ण होते. गेल्या 24 तासात 103 नव्या कोरोनाग्रस्ताची वाढ झाली आहे. यामुळे महामुंबईत 433 रुग्णांचा टप्पा कोरोनाने गाठला आहे. तर आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात रविवारी पाच तर 31 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीतील दगवलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या मृतांमध्ये सहा जणांना दीर्घकालीन आजार तर दोघे वृद्ध होते, असे पालिकेचे म्हणणे आहे.

मुंब्रा, दिवा, कळव्यात वाहनबंदी

मुंब्र्यात एका 57 वर्षीय रुग्णाचा केईम रुग्णालयात शनिवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण मुंब्र्यात सापडलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाचा नातेवाई असल्याचे समजते. मात्र मुंब्र्यातील रुग्णांचे दिल्ली कनेक्शन नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंब्य्रातील रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले असून यामध्ये मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मुंब्र्यात चार दिवस भाजी मार्केट देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

डोंबिवलीमध्ये  एका 67 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेला मधुमेहाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तिच्या संपर्कात आलेले 4 जण पॉझिटिव्ह आले असून ते कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाणे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. 

आतापर्यंत 54 जण कोरोनामुक्त

20 जण झाले कोरोनामुक्त, पालिकेच्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या 20 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता त्यांच्या चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पालिकेच्या माध्यमातून अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. राज्यभरात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 हजार 8 नमुन्यांपैकी 14 हजार 837 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत, तर 748 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 46 हजार 586  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3122  जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

तबलिगीसंबंधित आतापर्यंत राज्यात 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे,पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत, तर एक जण हिंगोलीतील आहे. तर त्यांच्या निकटसहवासितांपैकी 5 जण पिंपरी-चिंचवड येथे येथे कोरोनाबाधित आढळले आहेत. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी 519 टीम काम करत आहेत, तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात 439 टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपामध्ये 210 टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत, तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात 196 नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण 3078 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.