Sat, Oct 24, 2020 09:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मातोश्रीच्या प्रभागातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाखाली

मातोश्रीच्या प्रभागातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाखाली

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
मुंबई : प्रकाश साबळे 

पश्चिम उपनगरांतील बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी याठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे मातोश्रीचा प्रभाग म्हणून ओळखला जाणार्‍या सांताक्रूझ एच.पूर्व वॉर्डात मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणाखाली आणण्यास पालिका प्रशासनाला यश येत आहे. रविवारी सांताक्रूझमधील पालिकेच्या 10 वॉर्डांतून फक्त 38 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ही संख्या बोरिवली, कांदिवली, मालाड आणि अंधेरी आदी वॉर्डांतील कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा कमी आहे. यामुळे सांताक्रूझमधील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.   

एच.पूर्व वॉर्डात  सांताक्रूझ, वांद्रे आणि खार पूर्व विभाग येतात. या वॉर्डात एकूण 10 प्रभाग आहेत. या सर्व प्रभागातील नगरसेवक आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या आरोग्य तपासणीमुळे याठिकाणी कोरोनाची साखळी तोडण्यास पालिका प्रशासनाला यश येत आहे. रविवारी वॉर्ड क्र. 96 मधील बेहरामपाडा आणि नवपाडा येथील झोपडपट्टीत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. 

वॉर्ड क्र.92 व वॉर्ड क्र.94 मधील भारत नगर, पँथर नगर, ज्ञानेश्‍वर नगर आणि बीकेसी, जवाहरनगर, साईबाबा रोड, इंदिरा नगर या दोन्ही वॉर्डातून प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, तर वॉर्ड क्र. 89 आणि वॉर्ड क्र.95 येथील गावदेवी, डमेल्लो कंपाऊंड, धोबीघाट आणि खेरनगर, खेरवाडी, निर्मल नगर, दीपकवाडी, तीन बंगला या दोन्ही वॉर्डात प्रत्येकी 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तसेच वॉर्ड क्र. 90 आणि 93 मधील शासकीय वसाहत, कला नगर, गांधी नगर, अहिंसा नगर आणि कलिना, शास्रीनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, कोलीवारी व्हिलेज या ठिकाणी प्रत्येकी 3 कोरोनाग्रस्त आढळले. याबरोबरच वॉर्ड क्र. 87 आणि 88 मधील हनुमान टेकडी, गोळीबार, प्रभात कॉलनी आणि टीपीएस-5 आणि आग्रीपाडा, डावरी नगर, शिवाजी नगर या ठिकाणी प्रत्येकी 7 कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर वॉर्ड क्र. 91 मध्ये 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ते सर्व वाकोला व्हिलेज, सीएसटी रोड आणि सुंदर नगरातील आहेत. 

 "