Sat, May 30, 2020 14:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीच्या घनदाट झोपडपट्टीत कोरोना

धारावीच्या घनदाट झोपडपट्टीत कोरोना

Last Updated: Apr 06 2020 1:07AM
धारावी : अरविंद कटके

धारावीत रविवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. एक रुग्ण 48 वर्षाचा असून दुसरा 21 वर्षाचा तरुण आहे. विशेषत: झोपडपट्टीच्या भागात एकाच दिवशी दोन रुग्ण सापडल्याने धारावीतील रुग्णांची संख्या अवघ्या पाच दिवसात सहावर गेली आहे.

धारावी मुकुंद नगर रोडवरील शक्ती चाळीत राहणारा 48 वर्षीय ग्रहस्थ  काही दिवसापासून सर्दी, तापाने आजारी होता. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. शेवटी त्याला घरच्यांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. शनिवारी तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट होताच त्याची रवानगी कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये करण्यात आले आणि तो रहात असलेल्या धारावी मुकुंद नगर रोडवरील शक्ती चाळीला सील करून त्याच्या कुटुंबातील 12 लोकांना 14 दिवसासाठी क्वारंटाईन करून त्यांची रवानगी धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये केली. 

धारावी 60 फूट रस्त्यावरील कुट्टेवाडी परिसरातील मदिना नगर परिसरात राहणारा 21 वर्षीय तरुण नवी मुंबईतील एका लॅब मध्ये काम करत होता. पाच दिवसापूर्वी त्याला अचानक  अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने खासगी दवाखान्यात उपचार सुरू केले. मात्र आजार ठीक होण्याऐवजी चांगलाच वाढला. परिणामी त्याच्या घरच्यांनी त्याला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी घेतली असता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्याच्या घरच्यांसह माळ्यावर राहणार्‍या लोकांना होम क्वारंटाईन करून चिंचोली गल्ली सील केली आहे. दाटीवाटीने वसलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाबाधितांची संख्या सध्या चिंतेचे कारण बनली असून स्थानिक रहिवाशांनी प्रसंगावधान न राखल्यास येणार्‍या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाचा पहिला 54 वर्षीय रुग्ण 1 मार्च रोजी धारावीच्या जसमीन मिल रोडवरील डॉ. बालीगा नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटीत आढळुन आला. दुर्दैवाने त्याच दिवशी त्याचा अंत झाला. 2 मार्च रोजी वरळी येथील जिजामाता नगर येथे राहणारा आणि सफाई कामगार म्हणून धारावी मेन रोडवरील अभ्युदय बँकेलगत असलेल्या पालिका चौकीत कर्तव्यावर असलेल्या 52 वर्षीय ग्रहस्थाला कोरोनाची लागण झाली. 3 मार्च रोजी धारावी मेन रोडवरील वैभव अपार्टमेंटमध्ये राहणारा 34 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली तो मुंबई सेंट्रल येथील एका हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून कर्तव्यावर आहे. 4 मार्च रोजी सायंकाळी धारावी जसमीन मिल रोडवरील डॉ. बालीगा नगर को. ऑप. हौ. सोसायटीत राहणार्‍या क्वारंटाईनमधील 35 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली. या चारही ठिकाणांचा पत्ता धारावीचा असला तरी त्यांचा प्रत्यक्ष झोपडपट्टीशी संबंध नाही. हे चारही पत्ते तसे सधन परिसरातील अपार्टमेंटचे होते. हे चार रुग्ण आढळेपर्यंत कोरोना धारावीच्या झोपडपट्टीत दाखल झाला, असे समजले गेले नाही. आता मात्र दोन रुग्ण प्रत्यक्ष झोपडपट्टीत आढळल्याने धोक्याची घंटा वाजली आहे.