Sun, Aug 09, 2020 10:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टच्या 27 कर्मचार्‍यांचा कोरोनाने मृत्यू 

बेस्टच्या 27 कर्मचार्‍यांचा कोरोनाने मृत्यू 

Last Updated: Aug 02 2020 1:04AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून  मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या बेस्टमधील  27 कर्मचार्‍यांचा कोरोनाने  मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.  अपुर्‍या साधनसामुग्रीमध्ये देखील बेस्ट कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र, बेस्ट प्रशासनाकडून अद्यापही कोरोनाशी लढताना मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांची अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत  आहे.

बेस्ट उपक्रमाने लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सेवा दिली आहे.त्यामुळे सुरुवातीपासूनच बेस्ट कर्मचारी कोरोनाचे शिकार झाले आहेत. त्यात बेस्टकडून  मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरविण्यातही हयगय झाली. त्यातच बसफेर्‍या कमी पडत गेल्याने बसमध्ये गर्दीही वाढली. त्यातून कोरोना संसर्ग झालेल्या कर्मचार्‍यांचा  संख्येत भर पडू पडली.

सध्या बेस्ट मधील कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांची संख्या 1,490 आहे. त्यापैकी, 1,152 कामगार हे कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 77 टक्के इतके असल्याचेही बेस्ट प्रशासनाने नमूद केले आहे. पण कोरोनाने आतापर्यंत किती कर्मचारी मरण पावले आहेत, हे मात्र स्पष्ट केले नाही. बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने कोरोनाने मृत्यू पावलेल्या बेस्ट कर्मचार्‍यांची संख्या 107 इतकी असल्याचा दावा केला आहे. तर, बेस्टने कोरोनाने मृत झालेल्या 27 कामगारांच्या वारसांना नियुक्तीचे पत्र दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बेस्ट सार्वजनिक उपक्रम असून त्यांनी कर्मचार्‍यांविषयी अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली आहे. बेस्टमधील कोरोनाने मरण  पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आणखीनही जास्त असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.